दिल्लीच्या मंचावर होणाऱ्या नवऱ्याला आणून दाखवली अंगठी, ‘लावाँ’ गाण्यावर रोमान्स करत जॅस्मिनने शेअर केला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद.
‘यार ना मिले’ आणि ‘धुरंधर’ फेम लोकप्रिय पंजाबी गायिका जास्मिन सँडलस सध्या तिच्या गाण्यांमुळे नाही, तर एका खळबळजनक वैयक्तिक बातमीमुळे चर्चेत आली आहे. दिल्लीत आयोजित तिच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या पहिल्याच भव्य कॉन्सर्टमध्ये जास्मिनने चाहत्यांना एक अनपेक्षित आणि गोड धक्का दिला. लाइव्ह शो सुरू असतानाच तिने तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला म्हणजेच तिच्या होणाऱ्या पतीला मंचावर आणून आपल्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली.
जास्मिनच्या या होणाऱ्या पतीचे नाव शेखर चौधरी आहे. भर कॉन्सर्टमध्ये शेखरला मंचावर बोलवून तिने प्रेक्षकांना आपली साखरपुड्याची अंगठी दाखवली आणि म्हणाली, “हे आहेत माझे चौधरी साहेब! मी त्यांना मुद्दाम इथे बोलावले आहे. त्यांनीच मला ही अंगठी दिली आहे.” ही घोषणा करताना जास्मिनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती स्टेजवरच आनंदाने उड्या मारू लागली आणि तिने शेखरला घट्ट मिठी मारली. त्यानंतर तिचेच लोकप्रिय गाणे ‘लावाँ’ बॅकग्राउंडला वाजताच या दोघांनी स्टेजवर एक रोमँटिक डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमध्ये जास्मिनने परिधान केलेल्या भरजरी सोनेरी लेहंग्याने आणि तिच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जास्मिनसाठी हा आनंदाचा क्षण अधिक महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी ती प्रसिद्ध पंजाबी गायक गॅरी संधूला डेट करत होती. मात्र, त्यांचे नाते अत्यंत वाईट वळणावर संपले होते. या ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर पडायला तिला बराच काळ लागला होता, तसेच यामुळे तिच्या आयुष्याची दिशा हरवली होती, अशी कबुली तिने स्वतः दिली होती. आता शेखरच्या रूपाने तिच्या आयुष्यात प्रेमाचे पुनरागमन झाले आहे. या भावनिक घोषणेनंतर तिने ‘सिप सिप’, ‘शरारत’, आणि ‘तरस’ यांसारखी एकापेक्षा एक हिट गाणी सादर करत दिल्लीकरांना मंत्रमुग्ध केले. दिल्लीतील यशानंतर आता जास्मिनची ही ‘ड्रीम गर्ल इंडिया टूर’ मुंबई, बंगळुरू आणि चंदीगडमध्येही रंगणार आहे.




