राम मंदिरातील कथित अपहार आणि राजस्थानमधील बोगस गोशाळांवरून ठाकरे गटाच्या खासदारांनी मोदी-फडणवीसांना घेरले; महाराष्ट्रातील मराठीच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांना सवाल.
राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षांतराच्या चर्चांमधेच आता विरोधी पक्षाने थेट सत्ताधारी भाजपच्या ‘हिंदुत्वाच्या मॉडेल’वर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तब्बल १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा थेट निशाणा साधला. अयोध्येतील राम मंदिरापासून ते अगदी काळाराम मंदिरापर्यंत हिंदुत्वाच्या नावाने लूट सुरू असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. लवकरच या साडेतीनशे कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपशासित राजस्थानमधील परिस्थितीचा दाखला देत संजय राऊत म्हणाले की, तिथे गोशाळांच्या नावावर तब्बल १०० कोटी रुपयांचे बोगस अनुदान लाटले गेले आहे. ज्या गोशाळा अस्तित्वातच नाहीत, त्यांना पैसे दिले गेले आणि मेलेल्या गाईंच्या नावावरही भाजपने अनुदान लाटल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. “एकीकडे गोवंश हत्याबंदीचे कायदे आणून लोकांचे लिंचिंग (जमावाकडून हत्या) करायचे आणि दुसरीकडे मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खायचे, हे कोणते हिंदुत्व आहे?” असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. या कथित लुटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत गप्प का आहेत, असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून तोफ डागली. मुख्यमंत्री अनेकदा भाषणांमध्ये महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती असल्याचे हिरीरीने सांगतात. मग असे असतानाही मुंबई आणि महाराष्ट्रात प्रत्यक्ष पातळीवर मराठी माणसालाच का त्रास सहन करावा लागतो आहे? असा सवाल राऊत यांनी केला. जर मुख्यमंत्र्यांचा मराठी आत्मा आणि स्वाभिमान खरोखरच जिवंत असेल, तर त्यांनी या त्रासाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे, असे स्पष्ट आव्हान संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दिले.




