Alandi Palkhi : आळंदीत पालखी मार्गावर महिलेचा गोंधळ; वाहतूक बंदोबस्तादरम्यान पोलिसांशी वाद

spot_img

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे आळंदी शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल केले आहेत. पालखी मार्ग पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी आणि वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले होते. अशाच एका ठिकाणी एका महिलेने पोलिसांशी वाद घालत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, आळंदीतील पीसीएस चौक परिसरात ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या महिलेने आपले वाहन पालखी मार्गावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी पालखी सोहळ्यामुळे संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने पोलिसांनी तिला पुढे जाण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने रस्ता खुला करण्याची मागणी करत काही वेळ थेट रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही तिने आपली भूमिका कायम ठेवली.

यानंतर संबंधित महिलेने तेथील बॅरिकेड बाजूला करत वाहन पुढे नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवत पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवली आणि पालखी मार्गावरील बंदोबस्तात कोणताही अडथळा येऊ दिला नाही.

दरम्यान, आळंदी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित महिलेची आणि वाहनाची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ