Gujarat Serial Bomb Blast 2008 : ४९ दोषींची शिक्षा गुजरात हायकोर्टाकडून कायम; दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणातही ‘एनआयए’ची मोठी कारवाई!

spot_img

न्यायमूर्ती कोगजे आणि दवे यांच्या खंडपीठाने फेटाळल्या दोषींच्या याचिका; ३८ जणांना फाशी तर ११ जणांची जन्मठेप राहणार कायम

भारताला हादरवून सोडणाऱ्या २००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत गुजरात उच्च न्यायालयाने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या भीषण नरसंहारातील एकूण ४९ दोषींची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे. विशेष न्यायालयाने दिलेल्या फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात दोषींनी दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

२६ जुलै २००८ रोजी गुजरातचे अहमदाबाद शहर एकामागून एक झालेल्या बॉम्बस्फोटांनी हादरले होते. दहशतवाद्यांनी अवघ्या ७० मिनिटांच्या कालावधीत शहरात २० वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल २१ बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या क्रूर हल्ल्यात ५६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले होते. ‘हरकत-उल-जिहाद-अल इस्लामी’ (HuJI) या दहशतवादी संघटनेने या भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

या प्रकरणी विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत ३८ दहशतवाद्यांना फाशीची तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला दोषींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, मंगळवारी न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठाने हे आव्हान फेटाळत विशेष न्यायालयाचा निर्णय जशाच्या तसा कायम ठेवला.

एकीकडे अहमदाबाद स्फोटाचा निकाल लागला असतानाच, दुसरीकडे नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपासही आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या शरीराच्या अवयवांचे न्यायवैद्यकीय विश्लेषण (फॉरेन्सिक रिपोर्ट) विशेष न्यायालयात सादर केले आहे.

दिल्लीत झालेल्या या अतितीव्र व्हीबीआयईडी (VBIED) कार स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक लोक जखमी झाले होते. या स्फोटामुळे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले होते.

एनआयएने या प्रकरणातील ९ आरोपींना विशेष न्यायाधीश पीतांबर दत्त यांच्यासमोर हजर केले होते. न्यायालयाने सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली असून, आता या प्रकरणावर १३ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी डॉ. शाहिन सईद आणि इतर १० जणांविरोधात आधीच मुख्य आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तसेच, फेब्रुवारी २०२६ मध्ये अटक करण्यात आलेले झमीर अहमद अहंगर आणि तुफैल अहमद भट यांच्याविरोधातील पुरवणी आरोपपत्र सध्या एनआयए कोर्टाच्या विचाराधीन आहे. हे दोन्ही आरोपी ‘अन्सार गझवत-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेशी जोडलेले असून, ते शस्त्रे आणि दारूगोळा गोळा करण्याचे काम करत असल्याचा संशय आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ