Deadly Heatwave In Europe : युरोपात ‘हिटवेव्ह’चा हाहाकार, १३०० हून अधिक बळी; भारतापेक्षा कमी तापमानात तिथले रस्ते का वितळतायत?

spot_img

फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये ‘ओमेगा ब्लॉक’मुळे ४० अंशांच्या पार तापमान; मात्र, रस्ते वितळण्यामागे निकृष्ट दर्जा नसून युरोपियन देशांचे ‘विशिष्ट’ तंत्रज्ञान कारणीभूत.

भारतात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी सध्या संपूर्ण युरोप खंड भीषण उन्हाच्या झळांनी होरपळून निघाला आहे. सोशल मीडियावर युरोपमधील विविध शहरांतील अनेक चक्रावून टाकणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कडक उन्हामुळे डांबरी रस्ते वितळणे, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांना डांबर चिकटणे, ट्रामचे ट्रॅक वाकणे आणि मॉल-मार्टमधील चॉकलेट्स व आईस्क्रीम वितळणे अशा अभूतपूर्व दृश्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून सुरू झालेल्या या भीषण हिटवेव्हमुळे (उष्णतेची लाट) आतापर्यंत युरोपात १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, एकट्या फ्रान्समध्ये हा आकडा १००० च्या पार गेला आहे. जर्मनी, पोलंड आणि झेक प्रजासत्ताक या देशांमध्ये तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मोठी चर्चा रंगली आहे. भारतात उन्हाळ्यात तापमान सहज ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचूनही तिथले रस्ते वितळत नाहीत, मग युरोपातील रस्ते ३५ ते ४० अंश तापमानातच का वितळू लागले आहेत? युरोपियन देशांमधील रस्त्यांचा दर्जा खराब आहे का?

“युरोप हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने तापणारा खंड आहे. येथील घरे, कार्यालये आणि रस्ते हिवाळ्यातील कडक थंडी सहन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, इतकी तीव्र उष्णता पचवण्याची त्यांची क्षमता नाही.” टेड्रोस अधानोम घेबरेयेसूस (प्रमुख, WHO)

याचे उत्तर रस्ते बांधण्याच्या प्रक्रियेत आणि साहित्यात दडले आहे. याचा अर्थ युरोपमधील रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत असा अजिबात होत नाही. प्रत्येक देशात रस्ते बांधताना तिथल्या स्थानिक हवामानाचा विचार केला जातो.

युरोपियन रस्त्यांचे गुपित आणि वैज्ञानिक कारण:

  • थंडीपासून संरक्षणाची रचना: युरोपियन देशांमध्ये वर्षातील बहुतांश काळ कडक थंडी असते. त्यामुळे तिथले रस्ते ‘फ्रीज-थॉ सायकल’ (Freeze-Thaw Cycle) म्हणजे हिवाळ्यात बर्फ गोठणे आणि नंतर तो वितळणे या प्रक्रियेत टिकून राहतील अशा पद्धतीने बनवले जातात.
  • हॉट-रोल्ड डांबर (HRA): युरोपात रस्ते बांधण्यासाठी ‘हॉट-रोल्ड डांबर’ आणि घन डांबर काँक्रीटचा वापर केला जातो. या मिश्रणामध्ये बिटुमेन (डांबर) आणि पाषाणाचे अगदी बारीक तुकडे (Fine Aggregates) जास्त प्रमाणात असतात.
  • रस्त्यांची लवचिकता: थंडीत रस्ते आकुंचन पावल्यामुळे त्यांना तडे जाऊ नयेत, म्हणून हे रस्ते अत्यंत लवचिक (Flexible) बनवले जातात. जेव्हा तापमान ४० अंशांच्या पुढे जाते, तेव्हा हे लवचिक डांबर उष्णतेमुळे मऊ पडते आणि रस्ते वितळू लागतात.

याउलट, भारतात रस्ते बांधताना सुरुवातीपासूनच ४५ ते ५० अंशांचे कडक ऊन सहन करू शकतील अशा ‘हाय-स्टिफनेस’ (High-Stiffness) आणि कमी लवचिक डांबराचा वापर केला जातो.

हवामान तज्ज्ञांच्या मते, युरोपमधील ही भयानक परिस्थिती ‘ओमेगा ब्लॉक’ (Omega Block) नावाच्या विशिष्ट हवामान पॅटर्नमुळे निर्माण झाली आहे. यामध्ये दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या मध्ये एक उच्च दाबाचा पट्टा अडकून पडतो, ज्यामुळे उष्ण हवा एकाच ठिकाणी साचून राहते. युरोपमधील बहुतांश घरे आणि पायाभूत सुविधा या उष्णता बाहेर घालवण्यासाठी नव्हे, तर हिवाळ्यात उष्णता कोंडून ठेवण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळेच या ‘सायलेंट किलर’ ठरलेल्या उष्णतेमुळे लोकांचा घरातच गुदमरून मृत्यू होत असून, युरोपला आता बदलत्या हवामानानुसार आपल्या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने बदल करावे लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ