घरात दारू चालत नाही आणि सियाच्या हातात दारूची बाटली; प्री-वेडिंग फोटोशूटची तयारी करणाऱ्या बहिणीच्या आणि चेतनच्या नात्यावर भाऊ साहिलचे मोठे वक्तव्य.
लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात आता रोज नवीन आणि धक्कादायक वळणे येत आहेत. या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेली केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचे दोन वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत, ज्याने या गुन्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सिया एका पबमध्ये हातामध्ये दारूची बाटली घेऊन कोणाशीतरी फोनवर बोलताना दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती तिचा प्रियकर आणि केतनचा मुख्य मारेकरी चेतन चौधरी याच्या मिठीत रोमान्स करताना दिसत आहे. हे व्हिडिओ नेमके कधीचे आणि कुठले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या व्हिडिओमुळे सियाचा खरा चेहरा समोर आल्याची चर्चा आहे.
या व्हायरल व्हिडिओवर केतनच्या आईने अत्यंत भावूक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “सिया दारू पिते, ही गोष्ट तिने आणि तिच्या कुटुंबाने आमच्यापासून पूर्णपणे लपवून ठेवली होती. आमच्या घरात दारूला अजिबात स्थान नाही,” असे केतनच्या आईने म्हटले आहे.
“सियाने मला शपथ घेऊन सांगितले होते की, चेतनसोबत तिचे आता काहीच संबंध नाहीत आणि ते फक्त मित्र आहेत. तिच्यावर विश्वास ठेवूनच मी आई-वडिलांना काही सांगितले नाही.” साहिल गोयल (सियाचा भाऊ)
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक सर्वात मोठा कौटुंबिक खुलासा समोर आला आहे. केतन आणि सिया यांचे केवळ लग्नच ठरणार नव्हते, तर या दोन्ही कुटुंबांमध्ये ‘दोन सुती’ संबंध जोडले जाणार होते. सियाचा भाऊ साहिल याचे लग्न केतनच्या बहिणीसोबत ठरले होते. नोव्हेंबर महिन्यात आधी केतन-सिया यांचे आणि त्यानंतर साहिल व केतनच्या बहिणीचे लग्न होणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल १० तास कसून चौकशी केली. या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, सिया केतनसोबतच्या लग्नामुळे खूप आनंदी होती, दोघे व्हिडिओ कॉलवर तासनतास बोलायचे आणि ती प्री-वेडिंग फोटोशूटसाठी नवीन जागाही शोधत होती. चेतनच्या नात्याबद्दल सियाने मला खोटी शपथ दिल्यामुळे मी घरच्यांना काही सांगितले नाही, असा दावा साहिलने एका मुलाखतीत केला आहे.
परंतु, पोलिसांच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचा हा दावा संशयास्पद आहे. साहिलला त्याची बहीण सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील अनैतिक संबंधांबद्दल आधीपासूनच सर्वकाही ठाऊक होते, असा दाट संशय पोलिसांना आहे. या दुहेरी नात्याच्या गुंतागुंतीत आणि बहिणीच्या प्रेमापोटी साहिलने या गुन्ह्यात काही मदत केली आहे का, या दिशेने आता पुणे ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.




