Sanjay Raut : परभणीत राऊतांचा बंडू जाधवांवर अत्यंत शेलक्या भाषेत हल्लाबोल; म्हणाले, “असे आंडू-पांडू येतील आणि जातील, शिवसेना…”

spot_img

“२० वर्षांत पिठाची गिरणीही आणली नाही…”; खासदार संजय राऊतांची माजी सहकाऱ्यावर सडकून टीका

राजकारणातील गटतटांची लढाई आणि एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन केली जाणारी टीका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. परभणी येथे आयोजित शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत तोंडसुख घेतले. बंडू जाधव यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका करताना, “परभणीत अनेक आंडू-पांडू आणि बंडू आले अन् गेले, पण शिवसेना इथे मजबुतीने उभी आहे आणि ती कायम राहणार,” असा थेट इशारा राऊतांनी दिला.

मेळाव्याला संबोधित करताना संजय राऊत यांनी परभणीच्या राजकीय इतिहासाचा हवाला देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे कौतुक केले. ते म्हणाले, “जगात जर्मनी आणि भारतात परभणी का म्हणतात, हे मला परभणीकरांनी गद्दारांविरोधात केलेल्या एल्गारावरून समजले. स्वतःला ‘बंडू द बॉस’ म्हणवणाऱ्यांची खरी जागा परभणीची जनता दाखवून देईल. या माणसाने वीस वर्षे सत्तेत राहून, दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार होऊनही परभणीत साधी पिठाची गिरणीही आणली नाही; मग हा कसला विकास करणार?”

संजय राऊत यांनी बंडू जाधव यांच्या संपत्तीवर आणि बदललेल्या जीवनशैलीवरही गंभीर बोट ठेवले. “कधीकाळी पत्र्याच्या घरात राहणारा हा माणूस आज दोन हजार कोटींचा मालक कसा झाला? ही सर्व ताकद केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ठाकरे कुटुंबामुळे मिळाली होती, हे त्यांनी विसरू नये. आता हे लोक भाजपच्या दावणीला जाऊन बांधले गेले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

जाधव यांनी दिलेल्या आव्हानांना प्रत्युत्तर देताना राऊत अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, “आम्हाला चापटी मारण्याचे आव्हान देऊ नका, शिवसैनिकाला कोणाला तुडवण्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नसते. बंडू सारख्यांनी शिवसेनेला आव्हान देण्याची हिंमत करू नये.” आगामी विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करत, परभणीतून चारही आमदार निवडून देण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतल्यास २०२९ मध्ये १०० हून अधिक जागा जिंकून आपले सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जाहीर सभेतील संजय राऊत यांच्या वादळी भाषणामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उड आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ