French Woman Rescued In Pakistan : ‘त्या’ एका चुकीच्या निर्णयामुळे भोगला १४ वर्षांचा नरकवास; पाकिस्तानी नवऱ्याच्या कैदेतून फ्रेंच महिला आणि ५ मुलांची अखेर सुटका!

spot_img

ऑस्ट्रेलियात झालं होतं प्रेम, पाकिस्तानात पोहोचताच हिरावलं स्वातंत्र्य; मोठ्या मुलाच्या धाडसामुळे सुटलं कुटुंब

चित्रपटातील पडद्यावर दिसणाऱ्या काही कथा रिअल लाईफमध्ये किती भयंकर आणि वेदनादायी ठरू शकतात, याचाच प्रत्यय आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २०२५ मधील एका बॉलिवूड चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका विदेशी महिलेचा पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा आणि पाकिस्तानात जाऊन आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा थरार प्रत्यक्षात घडला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ‘बारा’ भागातून एका ५४ वर्षीय फ्रेंच महिलेची आणि तिच्या ५ मुलांची तब्बल १४ वर्षांच्या नरकवासातून सुटका करण्यात आली आहे. गेल्या १४ वर्षांपासून एका अंधाऱ्या आणि घाणेरड्या खोलीत कैद असलेल्या या कुटुंबाने अखेर मोकळ्या हवेत श्वास घेतला आहे.

या दुर्दैवी फ्रेंच महिलेचे नाव सिल्व्ही यास्मीना असे आहे. सिल्व्हीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये ऑस्ट्रेलियात असताना तिची ओळख एका पाकिस्तानी व्यक्तीशी झाली आणि पुढे दोघांनी लग्न केले. त्यानंतर २०१४ मध्ये सिल्व्ही आपल्या पतीसोबत पाकिस्तानात आली. मात्र, पाकिस्तानात पाऊल ठेवताच तिच्या आयुष्याला सर्वात मोठी कलाटणी मिळाली. तिचा पती पूर्णपणे बदलला आणि त्याने सिल्व्हीसह सर्व मुलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. पती आणि बापाचे कर्तव्य विसरून तो रोज त्यांना बेदम मारहाण करायचा आणि मानसिक छळ करायचा.

गेल्या १४ वर्षांपासून हे कुटुंब एका बंद खोलीत अत्यंत दयनीय अवस्थेत जगत होते. मात्र, १८ जून रोजी या छळातून सुटकेचा एक मार्ग सापडला. सिल्व्हीचा मोठा मुलगा कसाबसा घरातून गुपचूप बाहेर पडला आणि थेट स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने आपल्यावर आणि कुटुंबावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना सांगितली. मुलाची तक्रार ऐकताच पोलिसांनी तातडीने त्या घरावर छापेमारी केली आणि सिल्व्हीसह तिच्या पाच मुलांची सुखरूप सुटका केली. छळ करणाऱ्या नराधम पाकिस्तानी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुटकेनंतर सिल्व्हीने अश्रू अनावर होत सांगितले, “माझं भविष्य तर या माणसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, पण मला माझ्या मुलांचं आयुष्य धोक्यात आणायचं नव्हतं. आमच्या सर्वांच्या शरीरावर आजही त्या क्रूरतेच्या जखमा आहेत.” या घटनेनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने फ्रेंच दूतावासाला या प्रकरणाची माहिती दिली आहे. सिल्व्ही आणि तिची मुले लवकरात लवकर आपल्या मायदेशी, म्हणजेच फ्रान्सला परत जाण्यासाठी उत्सुक आहेत. स्थानिक पोलीस आणि फ्रेंच दूतावास आता हे कुटुंब सुरक्षितपणे फ्रान्सला पोहोचवण्यासाठी वेगाने पावले उचलत असून, या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनेने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ