Kolhapur : “आता काय ढाल-तलवार घेऊन अंगावर जाऊ का?”; ‘गोकुळ’वरून हसन मुश्रीफांचा थेट सवाल, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राजीनाम्याची तयारी!

spot_img

राजकारणात भाजप ‘मोठा भाऊ’च; आमदार १० टक्के कमिशन घेतात या आरोपांवर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे जाहीर आव्हान; अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर.

कोल्हापूरच्या राजकारणात सध्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत वादावर आणि आपल्या निष्ठेवर वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्यंत कडक आणि उद्विग्न शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “गोकुळचा अध्यक्ष शशिकांत पाटील-चुयेकर यांना करण्याचे आधी ठरले होते, पण महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे या आग्रहामुळे तसेच घडवून आणले. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही आम्ही आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात थेट मैदानात उतरलो. मग आता आमच्या निष्ठेची आणखी कसली परीक्षा द्यायची? काय ढाल-तलवार घेऊन त्यांच्या अंगावर जायचे का?” असा संतप्त सवाल मुश्रीफ यांनी विरोधकांना केला आहे.

महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला असतानाही काही नेत्यांकडून अंतर्गत चौकशा लावून संस्थांना नाहक त्रास दिला जात असल्याचा गुप्त निशाणाही त्यांनी साधला. जागावाटपाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. गोकुळच्या अंतिम मतदार यादीतील एकूण सभासद संख्येला २५ ने भागून जो आकडा येईल, त्या कोटा पद्धतीनुसारच जागांचे वाटप न्याय्य भूमिकेतून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्याच्या राजकारणात भाजप हाच ‘मोठा भाऊ’ असल्याचे मान्य करत, गोकुळच्या पातळीवर कोण मोठा या वादात पडून मला भाजपचा अपमान करायचा नाही, अशी मुत्सद्दीपणाती भूमिका त्यांनी घेतली.

दरम्यान, शासकीय ठेकेदारांकडून विकासकामांच्या निधीतून आमदारांना १० टक्के कमिशन द्यावे लागते, या सरसकट आरोपांचा मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. “आम्ही अजून आमची राजकीय नीतिमत्ता सोडलेली नाही. महाराष्ट्रातील सर्वच आमदारांना एकाच तराजूत तोलणे चुकीचे आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत जर एकाही ठेकेदाराने माझ्यावर असा आरोप केला, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या दौऱ्यावर येत असून महायुतीच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यात अमित शहा यांनी साखर कारखानदारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष १० मिनिटांचा वेळ दिला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखान्यांची अपात्र ११२ कोटींची कर्जमाफी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर थेट चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ