कच्चा माल आणि पॅकेजिंगच्या खर्चात प्रचंड वाढ झाल्याने FMCG कंपन्यांकडून किमतीत वाढ; टोमॅटो थेट ७० रुपयांवर, तर दूध प्रतिलिटर ५ रुपयांनी महाग.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या भडक्यामुळे आधीच होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांत दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थ, दुग्धजन्य उत्पादने आणि भाजीपाल्याच्या किमतीत झालेल्या छुप्या वाढीने गरिबांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या बजेटवर ‘सायलेंट अटॅक’ केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती ११ टक्क्यांनी, तर पॅकेजिंगचा खर्च चक्क ५६ टक्क्यांनी वाढल्यामुळे देशातील आघाडीच्या एफएमसीजी (FMCG) कंपन्यांना आपल्या उत्पादनांचे दर वाढवणे भाग पडले आहे. याचा थेट फटका हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गापासून ते नोकरदारांपर्यंत सर्वांनाच बसत आहे.
या महागाईच्या लाटेत सर्वात मोठा फटका सकाळच्या चहा आणि नाश्त्याला बसला आहे. अमूल आणि मदर डेअरी यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ ते ५ रुपयांची मोठी वाढ केली आहे. अमूल गोल्डचा एक लिटरचा पॅक आता ६८ रुपयांऐवजी ७० रुपयांना मिळत आहे, तर अमूल ताजाचे दर ५५ रुपयांवरून ५७ रुपयांवर गेले आहेत. मदर डेअरीच्या फुल-क्रीम दुधाची किंमत ६९ रुपयांवरून ७२ रुपये झाली असून, त्यांच्या म्हशीच्या दुधाचा दर थेट ७५ रुपयांवरून ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. दुधापाठोपाठ रोजच्या जेवणातील भाजीपाल्यानेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता थेट ६० ते ७० रुपयांवर पोहोचला आहे. वाहतूक खर्च (Transport Cost) वाढल्यामुळे कांदे, बटाटे, वांगी, भेंडी, आले आणि हिरवी मिरची यांच्या दरातही प्रतिकिलो ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
दुसरीकडे, घरगुती स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या वस्तूंनाही महागाईचे ग्रहण लागले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), डाबर, मॅरिको आणि कोलगेट यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंटच्या किमतीत ५ ते ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ओरल केअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी टूथपेस्टचे दर वाढवल्यामुळे आता दात घासणेही महाग झाले आहे. याशिवाय, कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ व पेयांचे दर ५.७५ टक्क्यांनी वधारले आहेत. रेस्टॉरंट चालकांनी त्यांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी गेल्या महिन्यात मेन्यू कार्डमधील दरांमध्ये १.८ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. एकूणच, सुईपासून ते हॉटेलच्या जेवणापर्यंत सगळंच महागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.




