Dowry Harassment : कल्याणमध्ये हुंडाबळी नराधमांचे क्रूर कृत्य; सुनेला अमानुष मारहाण करत थेट केले टक्कल, नणंद आणि सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेने ठोकली पळ!

spot_img

गर्भवती असतानाही उपाशी ठेवले, गरम पाण्याने हात भाजले; वालधुनी परिसरातील संतापजनक घटनेनंतर पीडितेवर उल्हासनगर रुग्णालयात उपचार सुरू, मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी.

आपण २१ व्या शतकातील आधुनिक भारताच्या गप्पा मारत असलो, तरी समाजात हुंड्यासारखी अनिष्ट आणि अमानुष प्रथा आजही महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कल्याणच्या वालधुनी परिसरातून हुंड्यासाठी सासरच्यांनी क्रौर्याची सर्व परिसीमा ओलांडल्याची एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पैशांची हाव असलेल्या सासरच्या मंडळींनी एका विवाहित सुनेचा केवळ छळच केला नाही, तर चक्क तिचे टक्कल करून तिला घरात डांबून ठेवले. या नरकयातनांमधून स्वतःची सुटका करून घेत पीडित महिला सासरहून पळून माहेरी पोहोचली असून, सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेतील पीडित महिला ही मूळची उल्हासनगर येथील रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचे लग्न कल्याणच्या वालधुनी येथील एका तरुणाशी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नाआधीच मुलीच्या माहेरच्यांनी आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आम्ही हुंडा देऊ शकत नाही, हे सासरच्यांना स्पष्ट केले होते. मात्र, लग्न आटोपून महिना उलटत नाही तोच सासरच्या लोकांचे खरे रूप समोर आले. माहेरहून पैसे आणि महागड्या वस्तू आणण्यासाठी या विवाहितेवर अतोनात जुल्म करण्यास सुरुवात झाली.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती गर्भवती असतानाही सासरच्यांनी तिची साधी दया माया ठेवली नाही. तिला दिवसांनुदिवस जेवण न देणे, घरातील शिल्लक अन्न मुद्दाम फ्रीजमध्ये कुलूप लावून ठेवणे, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करणे आणि थेट गरम पाण्याने हात जाळण्यासारखे गंभीर प्रकार तिच्यासोबत घडले. माहेरच्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने तिने अनेक महिने हा छळ मुकाट्याने सहन केला. मात्र, ७ जून रोजी सासरच्यांच्या क्रूरतेने टोक गाठले; तिच्या डोक्यात उवा झाल्याचे निव्वळ खोटे कारण पुढे करून सासू आणि नणंदेने बळजबरीने तिचे संपूर्ण टक्कल केले आणि तिला मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकले.

हा भयानक आणि लाजिरवाणा छळ असह्य झाल्यामुळे, पीडितेने कशीबशी सासरच्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि ती घरातून पळून थेट तिच्या बहिणीच्या घरी पोहोचली. तिने आपल्या भावाला फोन करून घडलेला सर्व प्रकार रडत रडत सांगितला. बहिणीने आणि भावाने तात्काळ तिला गंभीर अवस्थेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका निष्पाप महिलेचे आयुष्य केवळ पैशांच्या हव्यासापोटी नरक बनवणाऱ्या या प्रकरणाची दखल आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि पीडित अफसानाच्या सासरच्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून तिला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त हाक पीडितेच्या कुटुंबाकडून दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ