पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वाची सलग 12 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक प्रगतीसंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी मांडत गेल्या दशकातील बदलांवर प्रकाश टाकला.
फडणवीस यांनी सांगितले की, भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. देशाचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक असून भारत वेगाने प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळात 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी देश सक्षमपणे वाटचाल करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या आर्थिक स्थैर्याबाबत बोलताना त्यांनी विदेशी चलनसाठ्यात झालेल्या वाढीचा उल्लेख केला. मजबूत आर्थिक पाया आणि वाढलेली परतफेड क्षमता यामुळे भारत जागतिक स्तरावर अधिक विश्वासार्ह आर्थिक शक्ती म्हणून उदयास आल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती साधली असून यूपीआय प्रणालीमुळे व्यवहारांची संख्या आणि मूल्य दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक देश भारताच्या या डिजिटल मॉडेलचा अभ्यास करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कल्याण योजनांबाबत बोलताना फडणवीस यांनी गरिबी कमी करण्यासाठी, अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आरोग्य संरक्षण वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख केला. जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशनाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचा दावा करत त्यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक केले.




