इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षावरून जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने (US House of Representatives) ट्रम्प यांच्या युद्धविषयक अमर्याद अधिकारांना (War Powers) कात्री लावणारा एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. या नव्या प्रस्तावामुळे ट्रम्प यांना आता इराणविरुद्ध थेट लष्करी कारवाई किंवा नवीन हवाई हल्ल्यांचे (Airstrikes) आदेश स्वतःच्या मर्जीने देता येणार नाहीत. सभागृहात हा ठराव २१५ विरुद्ध २०८ अशा फरकाने मंजूर झाला असून, विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या स्वतःच्याच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याने ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला मोठा आळा बसला आहे.
या अंतर्गत राजकीय दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्धाबाबत आपली भूमिका अचानक मवाळ केली आहे. ट्रम्प यांनी प्रशासकीय बैठकीत स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईत एखाद्या अमेरिकी सैनिकाचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत अमेरिका इराणवर मोठा लष्करी हल्ला करणार नाही. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांशी खासगीत चर्चा करताना म्हटले आहे की, जर तेहरानने (इराणने) अमेरिकी सैन्याला लक्ष्य केले तरच आपण युद्धविराम संपवण्याचा विचार करू, अन्यथा लष्करी हल्ले आणि एअरस्ट्राईकवर काही आठवड्यांसाठी बंदी कायम राहील. जगाला सध्या ट्रम्प यांच्या नेमक्या भूमिकेचा अंदाज येत नसला तरी अंतर्गत दबावामुळे त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रतिनिधी सभेने मंजूर केलेल्या या कडक ठरावामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या लष्करी शक्ती आता थेटपणे मर्यादित करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावाद्वारे हाऊसने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, इराण आणि आसपासच्या परिसरातून अमेरिकेचे सैनिक टप्प्याटप्प्याने परत बोलवण्यात यावेत, तसेच युद्ध आणखी भडकेल अशी कोणतीही प्रक्षोभक कारवाई केली जाऊ नये. इराणसोबतच्या या संघर्षात जागतिक बाजारपेठेची आणि अर्थव्यवस्थेची मोठी कोंडी झाली असताना, ट्रम्प यांच्या युद्धखोर भूमिकेला स्वतः अमेरिकेतूनच विरोध होत असल्याचे या निर्णयावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता इच्छा असूनही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणवर थेट हल्ला करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.




