राबडी देवींना नव्या नोटिसीमुळे आरजेडी आक्रमक; ‘घरून काढू शकता, लोकांच्या मनातून कसे काढणार?’ रोहिणी आचार्य यांचा संतप्त सवाल
बिहारच्या राजकारणाचे गेली दोन दशके मुख्य केंद्र राहिलेला आणि राष्ट्रीय जनता दलाची (आरजेडी) मुख्य ओळख असलेला पाटण्यातील ‘१० सर्क्युलर रोड’ हा सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना देण्यात आली आहे. प्रशासनाने हे निवासस्थान आता बिहारचे पशु आणि मत्स्य उद्योग मंत्री नंद किशोर राम यांना विसावित केले आहे. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनाजवळ असलेला हा व्हीआयपी बंगला केवळ राबडी देवींचे घर नव्हते, तर लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीत आरजेडीच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा आणि धोरणात्मक बैठकांचा साक्षीदार होता. याआधी नोव्हेंबर २०२५ मध्येही अशीच नोटीस देण्यात आली होती आणि आता पुन्हा नव्याने नोटीस जारी झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. प्रशासनाने राबडी देवी यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून मंजूर झालेल्या ‘३९ हार्डिंग रोड’ येथील निवासस्थानात स्थलांतरित होण्यास सांगितले आहे.
या कारवाईवर बोलताना बिहार विधानसभेचे अध्यक्ष प्रेमकुमार यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, आरजेडीने या कारवाईला थेट ‘राजकीय सूडबुद्धी’ म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते शक्ती यादव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या वाढत्या प्रभावावर निशाणा साधला आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, “कोट्यवधी लोकांचे नेते असलेल्या लालू प्रसाद यांना अपमानित करणे हीच सरकारची प्राथमिकता आहे. तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढू शकता, परंतु जनतेच्या हृदयातून कसे काढणार?” लालूजींची बिघडलेली प्रकृती पाहता सरकारने किमान त्यांच्या राजकीय स्थानाचा तरी विचार करायला हवा होता, अशी भावनिक सादही त्यांनी घातली आहे.




