मुंबई-दिल्लीपेक्षाही छोट्या असलेल्या ‘लिकटेनस्टाईन’ची थक्क करणारी मार्केटिंग मोहीम; पर्यटनासाठी लढवली होती अजब शक्कल
फ्लॅट, कार किंवा कपडे भाड्याने मिळणे आता सामान्य झाले आहे, पण संपूर्ण देशच भाड्याने मिळतो असं सांगितलं तर? जगाच्या नकाशावर स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान वसलेला ‘लिकटेनस्टाईन’ (Liechtenstein) नावाचा एक छोटा आणि अतिशय श्रीमंत देश एकेकाळी चक्क भाड्याने दिला जात होता. दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांपेक्षाही लहान आकारमान आणि अवघी एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या देशाने जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पर्यटनातून महसूल गोळा करण्यासाठी ही अनोखी ‘मार्केटिंग मोहीम’ सुरू केली होती. या ऑफरअंतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रति रात्र ७०,००० अमेरिकन डॉलर (सुमारे ६० लाख रुपये) मोजून हा देश भाड्याने घेऊ शकत होती. सर्वात मोठी गंमत म्हणजे, देश भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्यासोबत तब्बल ९०० पाहुणे आणण्याची परवानगी होती, ज्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि फिरण्याची सोय यात समाविष्ट होती.
या अजब योजनेमध्ये पाहुण्यांसाठी ५०० हून अधिक आलिशान बेडरूम्स, बाथरुम आणि तिथल्या रस्त्यांना तात्पुरते स्वतःचे नाव देण्याची सोय करण्यात आली होती. इतकेच नाही, तर देश भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचे खास चलन (Currency) दोन ते तीन दिवसांसाठी तिथे कायदेशीररित्या चालवले जायचे. या अतिथींना तिथल्या राजकुमारासोबत बसून उच्च दर्जाच्या वाईनचा अस्वाद घेण्याची सुवर्णसंधीही मिळायची. एका उंच टेकडीवरील राजवाडा, निसर्गाची अथांग उधळण आणि द्राक्षांचे नयनरम्य बगीचे हे या देशाचे मुख्य आकर्षण आहे. केवळ जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी सरकारने आखलेली ही अनोखी योजना १६ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०११ मध्ये अधिकृतपणे बंद करण्यात आली. आता हा देश भाड्याने मिळत नसला, तरी त्याची ही अजब कहाणी आजही जगभरात चर्चिली जाते.




