राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून आता सर्वांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. “पाऊस नेमका कधी येणार?” आणि “यंदा समाधानकारक पाऊस पडणार का?” असे प्रश्न सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाकडून सातत्याने विचारले जात आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजामुळे चिंता आणखी वाढली आहे. हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर करत देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
याआधी हवामान विभागाने देशभरात सुमारे 92 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता नव्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत केवळ 90 टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यातही 4 टक्के अधिक किंवा कमी फरक राहू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तब्बल 60 टक्के असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या पावसावर ‘सुपर एल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून कमकुवत राहू शकतो. याचा फटका शेतीसह विविध उद्योगधंद्यांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते.
दरम्यान, आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2026 मध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.




