“तिने देशाला गौरव मिळवून दिलाय…”; विनेशला परवानगी देतानाच क्रीडा धोरणात हस्तक्षेप न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाला समज.
गेल्या काही काळापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. आशियाई खेळ २०२६ च्या (Asian Games 2026) निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला दिली आहे. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि विनेश यांच्यातील नियमांच्या वादावर सुनावणी करताना न्यायालयाने विनेशचे देशासाठीचे योगदान मान्य करत हा निर्णय दिला. त्यानुसार आता ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचणी प्रक्रियेत विनेशला आपले कसब दाखवता येणार आहे.
आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांचे वेळापत्रक आणि नियमांवरून भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमध्ये वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी विनेश फोगाटने प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने विनेशच्या बाजूने निकाल देत तिला चाचणीत भाग घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, या निर्णयामुळे खेळाच्या नियोजित स्पर्धा आणि निवड प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा करत, भारतीय कुस्ती महासंघाने थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, विनेश फोगाटचे प्रकरण हे सामान्य खेळाडूंपेक्षा वेगळे आहे. “जर ही दुसरी कोणतीही खेळाडू असती, तर प्रकरण वेगळे असते. विनेशने देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव मिळवून दिला आहे,” असे म्हणत न्यायालयाने तिची पात्रता आणि देशासाठीचे योगदान सर्वोच्च मानले आणि तिला निवड चाचणीत उतरण्यास हिरवा कंदील दाखवला.
विनेशला दिलासा दिला असला तरी, सर्वोच्च न्यायालयाने क्रीडा धोरण आणि वेळापत्रकावरील कुस्ती महासंघाचे अधिकारक्षेत्र मान्य केले आहे. तसेच अशा प्रकरणात वारंवार हस्तक्षेप करणाऱ्या उच्च न्यायालयाला समजही दिली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नरसिंह विनेशला उद्देशून म्हणाले, “तुम्ही एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहात, तुम्ही देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे, पण ‘देश प्रथम’ येतो. उच्च न्यायालय संपूर्ण वेळापत्रकात अशा प्रकारे व्यत्यय आणू शकत नाही.” पुढे बोलताना त्यांनी कठोर शब्दांत सांगितले की, “हे काही वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश नाहीत. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. न्यायालयांनी क्रीडा स्पर्धांच्या संपूर्ण वेळापत्रकात अशा प्रकारे हस्तक्षेप करून ते विस्कळीत करणे योग्य नाही.”
सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला ३०-३१ मे रोजी होणाऱ्या चाचण्यांमध्ये भाग घेण्याची तात्पुरती परवानगी देऊन दिलासा दिला असला, तरी कुस्ती महासंघाच्या मूळ याचिकेवर तिचे अधिकृत उत्तरही मागवले आहे. या हाय-व्होल्टेज प्रकरणाची पुढील सुनावणी आता पुढच्या आठवड्यात होणार आहे. मात्र, तूर्तास विनेश फोगाटसाठी आशियाई खेळांचे तिकीट मिळवण्याची मोठी संधी या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.




