Mumbai : दुकाने, हॉटेल्स आणि कंपन्यांकडून अद्याप मराठी फलकांकडे दुर्लक्ष; प्रशासनाने सुरू केली विशेष तपासणी मोहीम

spot_img

मुंबईतील अनेक दुकाने, हॉटेल्स, कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये आजही मराठी भाषेतील नामफलक लावले गेले नसल्याचे महापालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. मराठी भाषेत आणि ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक असतानाही अनेक आस्थापनांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

कुर्ला, सांताक्रूझ पूर्व, वांद्रे पूर्व, चर्नी रोड, मरीन लाईन्स यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १०१ आस्थापनांमध्ये मराठी नामफलक नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील माहिती उपमहापौर संजय घाडी आणि मुंबई महापालिका विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिली. त्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांना जाब विचारल्यानंतर प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली.

महापालिकेकडून विविध विभागांमध्ये विशेष धाडसत्र राबवण्यात आले. मुख्य रस्ते आणि गजबजलेल्या बाजारपेठांमधील आस्थापनांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. विशेषतः सी विभाग, एच/पूर्व आणि एल विभागात मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम पार पडली.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ३,३२० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३,२१९ आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावल्याचे आढळले, तर १०१ ठिकाणी अद्याप नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. या आस्थापनांवर योग्य ती कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मराठी भाषेचा सन्मान आणि स्थानिक ओळख जपण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ