NCP Working Committee : तटकरे-पटेल नाराजीच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधारित यादी निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची तयारी

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत राजकारणाला वेग आला असून पक्षाच्या कार्यकारिणीवरून मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी नुकतीच पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे वातावरण चांगलेच तापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः सुनील तटकरे यांच्याबाबत व्यक्त झालेल्या नाराजीमुळे बैठकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला सुधारित कार्यकारिणीची नवी यादी लवकरच पाठवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या यादीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने त्यांना बाजूला करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याचेही बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या कार्यकारिणीत काही महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या जागी हसन मुश्रीफ यांना स्थान मिळू शकते. तसेच सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारिणीतून वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी राजकीय हालचाली वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, या बैठकीदरम्यान अनेक घडामोडींनीही लक्ष वेधले. प्रफुल पटेल यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती, तर पार्थ पवार यांनी सुनील तटकरे बोलण्यापूर्वीच बैठक सोडल्याचे सांगितले जाते. याशिवाय सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यातही काही मुद्द्यांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचा 10 जून रोजी होणारा स्थापना मेळावा मुंबईत घ्यायचा की पुण्यात, यावरूनही नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.

बैठकीत सुनेत्रा पवार यांनीही आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अर्थ खाते पुन्हा मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुढील काही दिवसांत कोणते नवे वळण घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ