Shrestha Iyer On Online Abuse : पंजाब किंग्स आयपीएलमधून बाहेर पडताच श्रेयस अय्यरच्या बहिणीला नेटकऱ्यांनी अश्लील भाषेत केले ट्रोल; श्रेष्ठाने व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल

spot_img

जुन्या व्हिडिओवरून चाहत्यांचा संताप; ऑफिसमध्ये फोन करून कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना दिल्या जात आहेत शिवीगाळ

आयपीएल २०२६ मधील पंजाब किंग्सचा (PBKS) प्रवास संपुष्टात आला असून संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सुरुवातीच्या सात सामन्यांत अपराजित राहिलेल्या पंजाबच्या कामगिरीत नंतर मोठी घसरण झाली आणि संघाला सलग ६ सामने गमवावे लागले. मात्र, या क्रीडा जगतातील पराभवाचा फटका आता थेट खेळाडूंच्या कुटुंबियांना बसत असून, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर हिला सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोल केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाल्यानंतर, श्रेष्ठाने पंजाबच्या काही समर्थकांसोबत नाचतानाचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने तो १ गुण केकेआरला ‘देणगी’ दिल्याचा उपरोधिक उल्लेख केला होता. पंजाबचा संघ स्पर्धेतून बाद होताच, ट्रोलर्सनी तिचा हा जुना व्हिडिओ शोधून काढत तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

सततच्या छळानंतर श्रेष्ठा अय्यरने दोन व्हिडिओ जारी करत ट्रोलर्सवर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही फ्रस्ट्रेटेड आणि रिकामटेकड्या (जॉबलेस) युजर्सनी मर्यादा ओलांडल्याचा आरोप तिने केला. श्रेष्ठा म्हणाली, “माझ्या कमेंट सेक्शनमध्ये अत्यंत अश्लील मेसेज केले जात आहेत. इतकंच नाही तर हे लोक थेट माझ्या ऑफिसमध्ये फोन करून माझे सहकारी, विद्यार्थी आणि माझ्या कुटुंबालाही शिवीगाळ करत आहेत. कोणत्याही वेळी फोन करून माझा मानसिक छळ केला जात आहे.”

ती व्हिडिओमध्ये पुढे म्हणाली की, तो जुना व्हिडिओ केवळ एक निखळ थट्टा होती आणि त्यात कोणताही वाईट हेतू नव्हता. “मी फक्त माझ्या भावाच्या संघाला पाठिंबा देत होते. याचा अर्थ असा नाही की मी इतर कोणत्याही संघाचा किंवा खेळाडूचा द्वेष करते. माझा भाऊ स्वतः क्रिकेटर असल्याने मला सर्व खेळाडूंबद्दल आदर आहे. जेव्हा कधी एखादा संघ हरतो, तेव्हा चाहते खेळाडूंच्या पत्नी किंवा बहिणींना दोष का देतात? जिंकणे-हारणे हा खेळाचा भाग आहे आणि माझा भाऊ जेव्हा जिंकेल, तेव्हा मी पुन्हा नक्कीच आनंद साजरा करेन!”

पंजाब किंग्सने या हंगामात १५ गुणांसह आपला प्रवास संपवला, पण मैदानावरील या पराभवाचे पर्यवसान सोशल मीडियावरील अशा विकृत मानसिकतेत आणि वैयक्तिक छळात झाल्यामुळे क्रीडा जगतातून हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ