नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा; गंगापूरमध्ये सव्वा रुपया भाव मिळाल्याने कांदा रस्त्यावर फेकला
राज्यात कांद्याला मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे शेतकरी कमालीचे आक्रमक झाले असून, महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी शेतकऱ्यांच्या सोबतीने थेट रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. नाशिकच्या चांदवड येथे शेतकऱ्यांनी ‘क्रांती महामोर्चा’ काढत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली. तर सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरमध्येही कांदा प्रश्नी तीव्र आंदोलने झाली.
नाशिकमधील या महामोर्चामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह हजारो कार्यकर्ते गळ्यात कांद्याची माळ घालून सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान एक रंजक आणि थरारक प्रसंग घडला. नेत्यांना घेऊन जाणारी बैलगाडी अचानक बिथरली, ज्यामुळे रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ खाली उतरावे लागले व त्यांनी पायीच मोर्चा पुढे नेला. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार मिश्कीलपणे म्हणाले, “बैल म्हणतोय थेट सरकारला जाऊन धडकतो, जर सरकार समोर आले असते तर बैलाने नक्कीच धडक दिली असती.”
सोलापूरमध्ये कांदा प्रश्नावर आंदोलन करताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प तात्यांच्या आहारी गेले आहेत. ‘ट्रम्प बोले मोदी डोले’ अशी सध्या देशाची अवस्था झाली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून सरकार केवळ अदानींचे कर्ज माफ करण्याचे काम करत आहे. ‘ये तो शुरुवात है, आंदोलन अभी बाकी है’!”
मोर्चाचे नेतृत्व करताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “१८ तारखेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी २४ रुपये भाव देण्याचे कबूल केले होते आणि आता १२ रुपये दिला म्हणत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नाफेडच्या घोळामुळे शेतकरी संकटात आहे. शेतापासून मार्केटपर्यंत कांदा आणायला १ लाख रुपये खर्च येतो, पुढील ३ वर्षे शेतकऱ्यांनी जगायचे कसे? सरकारमध्ये फक्त कोणाला कोणती MLC ची सीट मिळणार, याच चर्चा सुरू आहेत,” असा थेट आरोप पवारांनी केला.
तसेच अंबादास दानवे यांनीही सरकारवर तोफ डागली. “सरकारने १२ रुपये दर जाहीर करून १०-१२ दिवस झाले, पण एकाही शेतकऱ्याची खरेदी या दराने झालेली पावती सरकारने दाखवावी. हे सरकार केवळ जनतेची दिशाभूल करत आहे,” असे दानवे म्हणाले.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो अवघा सव्वा रुपया (१२५ ते १३० रुपये प्रतिक्विंटल) भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी बाजाराच्या गेटसमोरच सर्व कांदा रस्त्यावर फेकून दिला आणि गंगापूर-वैजापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून, आता हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.




