शूटिंगच्या अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी चित्रपट सोडल्याने ‘FWICE’ची मोठी कारवाई; निर्मात्यांचे ४५ कोटींचे नुकसान
बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘डॉन ३’ या चित्रपटातून अवघ्या काही दिवस आधी अचानक माघार घेतल्यामुळे, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने रणवीरवर थेट बंदी (असहकाराचा आदेश) घातली आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपटसृष्टीतील कोणत्याही तंत्रज्ञाने, कलाकाराने किंवा प्रॉडक्शन हाऊसने जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत रणवीरसोबत काम करू नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहला ‘डॉन’ या पात्राचा अंदाज अधिक डार्क आणि आक्रमक हवा होता, तर दिग्दर्शक फरहान अख्तरचा दृष्टिकोन वेगळा होता. या वैचारिक मतभेदांमुळे ऐन शूटिंगच्या तीन आठवड्यांपूर्वी रणवीरने चित्रपटातून काढता पाय घेतला.
चित्रपटाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते आणि युनिट शूटिंगला निघण्यापूर्वी प्री-प्रॉडक्शन, लोकेशन्स, हॉटेल्स आणि २०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर तब्बल ४५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता. रणवीरच्या या निर्णयामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणावर संताप व्यक्त करत FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित आणि अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, “चित्रपटाचे काम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर कलाकारांनी प्रकल्प सोडण्याची ही प्रवृत्ती अत्यंत गंभीर आहे. आम्ही रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी तीन वेळा स्मरणपत्रे पाठवली, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. इंडस्ट्रीला हा स्पष्ट संदेश द्यायचा आहे की, कोणताही सुपरस्टार कायद्यापेक्षा मोठा नाही.”
या संपूर्ण वादावर आणि बंदीच्या कारवाईवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना रणवीर सिंहच्या प्रवक्त्याने सांगितले की, “रणवीरला चित्रपटसृष्टी आणि ‘डॉन’ फ्रँचाइझीबद्दल मनापासून आदर आहे. व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे नेहमीच प्रतिष्ठा, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने हाताळले पाहिजेत, असे त्याचे मत आहे. कोणत्याही अफवांवर किंवा चर्चांवर सार्वजनिक भाष्य करणे त्याला योग्य वाटत नाही आणि त्याचे पूर्ण लक्ष सध्या त्याच्या आगामी कामांवर आहे.”
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर रणवीर सिंह नव्या युगाचा ‘डॉन’ म्हणून पडद्यावर येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, मात्र आता या कारवाईमुळे चित्रपटाचे भवितव्य आणि रणवीरच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




