Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात नवा वाद; आरोपी संचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

spot_img

देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक वादग्रस्त बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक मानला जाणारा शिवराज मोटेगावकर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. पुण्यातील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा संचालक असलेल्या मोटेगावकरला या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मोटेगावकरने आपल्या मुलासाठी नीट परीक्षेचा पेपर मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या व्हिडीओमुळे प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे. व्हिडीओमध्ये मोटेगावकर वर्गातील बाकावर उभा राहून विद्यार्थ्यांवर आंब्याच्या पानांनी पाणी शिंपडताना दिसत आहे. एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने घेऊन तो विद्यार्थ्यांना “तुम्हाला AIIMS मध्ये प्रवेश मिळेल” अशा शुभेच्छा देताना दिसतो.

हा प्रकार विज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थेत घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेषतः विज्ञानवादी संघटनांनी यावर कठोर प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं जात असल्याची टीका केली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारचं वर्तन अपेक्षित नसल्याचं मतही व्यक्त होत आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून वेगाने सुरू असून या घोटाळ्यात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ