Xi Jinping India visit 2026 : तब्बल ७ वर्षांनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिका-पाकिस्तानची धाकधूक वाढली

spot_img

सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन यांच्यासोबत जिनपिंगही एकाच मंचावर येणार; रशियाच्या मध्यस्थीला मोठे यश, भारत-चीन संबंधांचा नवा अध्याय सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून सीमावादावरून एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे भारत आणि चीन आता आंतरराष्ट्रीय राजकारणात आणखी जवळ येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळताना दिसत आहे. सीमेवर सध्या शांतता असून दोन्ही देशांमधील संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये शी जिनपिंग हे नवी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता असून, भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत ऐतिहासिक मानला जात आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण वृत्तानुसार, आगामी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ‘ब्रिक्स’ (BRICS) देशांच्या नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात येऊ शकतात. विशेष म्हणजे, तब्बल ७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. या परिषदेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, रशियन वृत्तसंस्था ‘TASS’ ने रशियन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पुतिन यांच्या भारत दौऱ्याची पुष्टी केली आहे. यामुळे दिल्लीतील एकाच मंचावर भारत, रशिया आणि चीन या जगातील तीन महासत्ता एकत्र आलेल्या पाहायला मिळतील.

भारत आणि चीनमधील हा सुधरत असलेला सुसंवाद अमेरिका आणि पाकिस्तानसाठी मात्र एका मोठ्या धोक्याची घंटा मानला जात आहे. रशियासाठी भारत हा अत्यंत जुना, विश्वासू आणि महत्त्वाचा मित्र राहिला आहे, तर दुसरीकडे चीनसोबतही रशियाचे धोरणात्मक संबंध आहेत. अशा परिस्थितीत जर भारत आणि चीन एकत्र आले, तर जागतिक पातळीवर रशियाची ताकद प्रचंड वाढणार आहे. याच कारणामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे गेल्या काही काळापासून भारत आणि चीनला एकाच मंचावर आणण्यासाठी पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. यापूर्वी चीनमध्ये हे तिन्ही देश एकत्र आले होते, परंतु आता भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत होणारी ही भेट जागतिक राजकारणाची समीकरणे बदलून टाकणारी ठरेल, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ