इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कडाडले; परकीय चलन वाचवण्यासाठी १ वर्ष सोने खरेदी व विदेशवारी टाळण्याचे मोदींचे देशवासीयांना आवाहन*
जागतिक पातळीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट फटका भारतीय बाजारपेठेला बसला असून केंद्र सरकारकडून काही मोठे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या दरवाढीनंतर अवघ्या पाच दिवसांतच पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर परकीय चलनाची होणारी घसरण रोखण्यासाठी आणि तिजोरीवरील वाढता दबाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया मजबूत राहावा यासाठी नागरिकांनी पुढील १ वर्षाकरिता सोने खरेदी करणे पूर्णपणे टाळावे, तसेच या काळात पर्यटनासाठी केल्या जाणाऱ्या विदेशवाऱ्याही शक्यतो टाळाव्यात, अशी विनंती पंतप्रधानांनी केली आहे.
या जागतिक आर्थिक घडामोडींच्या दरम्यानच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या युरोपियन देशांच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते इटलीमध्ये पोहोचले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिलेल्या विशेष निमंत्रणाचा स्वीकार करून मोदी हे रोमला पोहोचले, जेथे त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. इटलीच्या हॉटेलमध्ये उपस्थित भारतीय समुदायाने पारंपारिक आणि भव्य पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसोबत घेतलेला एक खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला असून, “रोममध्ये आपले स्वागत आहे, माझ्या मित्रा…” असे भावनिक कॅप्शन त्याला दिले आहे. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी २०२३ मध्येही मेलोनी यांनी शेअर केलेला अशाच प्रकारचा फोटो प्रचंड चर्चेत आला होता.
या दौऱ्यात भारत आणि इटली यांच्यात एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडणार असून, यामध्ये दोन्ही देशांतील संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याबाबत चर्चा होईल. सध्या युरोपियन युनियनमध्ये इटली हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. वर्षातील आकडेवारीनुसार, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १४.२५ बिलियन युरोवर पोहोचला असून, इटालियन कंपन्यांनी भारतात तब्बल ३.६६ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. या ऐतिहासिक बैठकीत दोन्ही देशांनी लष्करी उपकरणांच्या देवाणघेवाणीसह क्वांटम टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्याचे मोठे करार केले आहेत. सध्या इटलीमध्ये सुमारे १.८७ लाख भारतीय नागरिक वास्तव्यास असून, या नव्या करारांमुळे भारत आणि इटलीचे राजनैतिक व आर्थिक संबंध येत्या काळात अधिक मजबूत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.




