महाराष्ट्रात अनधिकृतपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आता अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिवहन विभागाच्या कारवाईनंतर आता महाराष्ट्र सायबर विभाग यांनी थेट Apple आणि Google यांना नोटिसा बजावत Ola, Uber आणि Rapido यांसारखी राईड-हेलिंग ॲप्स ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या मते, या कंपन्या कोणत्याही वैध परवान्याशिवाय महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा चालवत असून त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसोबत वाहतूक व्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे.
15 मे रोजी जारी करण्यात आलेल्या नोटिसींमध्ये संबंधित ॲप्सवरील प्रवेश रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयातून ही कारवाई करण्यात आली असून, राज्य सरकारने थेट डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांनाच लक्ष्य करण्याची ही पहिली मोठी घटना मानली जात आहे.
राज्य सरकारचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात सध्या बाईक टॅक्सी सेवांना अधिकृत मान्यता नाही. तरीदेखील या कंपन्या दुचाकी वाहनांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रवासी सेवा पुरवत आहेत. परिवहन विभागाने वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे.
प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी या सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी करत संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, चालक पडताळणी, वाहन परवाने, विमा संरक्षण आणि महिला सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना अत्यंत अपुऱ्या आहेत. त्यामुळे विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.




