दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे सध्या तुरुंगात असलेला भोंदूबाबा अशोक खरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असतानाच आता त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या जमिनींमुळे मोठ्या आर्थिक लाभाची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे शहरात नव्या चर्चांना उधाण आले असून, तुरुंगात असतानाही खरात कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रिंग रोड प्रकल्पासाठी विविध भागांतील जमिनी संपादित करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत खरात कुटुंबाच्या मालकीच्या काही जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे. गवळणे परिसरात असलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर तब्बल 82 लाख 83 हजार रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय पाथर्डी शिवारातील जमिनींसाठी खरात यांच्या मुली तृप्तवाला खरात आणि सृष्टी खरात यांना मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे समोर आले आहे. या जमिनीच्या बदल्यात त्यांना सुमारे 1 कोटी 82 लाख रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकूणच रिंग रोड प्रकल्पातून खरात कुटुंबाला जवळपास तीन कोटी रुपयांचा लाभ होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. एका बाजूला गंभीर आरोपांमुळे अशोक खरात तुरुंगात असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या कुटुंबाच्या नावावर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता तपास यंत्रणांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.




