अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; ‘पॉवर गेम’साठी ज्येष्ठ नेत्याची नवी खेळी सुरू असल्याच्या चर्चा
“राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो,” या उक्तीचा प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा येत आहे. गेल्या काही वर्षांतील अनपेक्षित घडामोडी अनुभवणाऱ्या जनतेला आता नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनानंतर, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्त्वावरून अंतर्गत मतभेद तीव्र झाल्याचे समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावापुढील ‘प्रदेशाध्यक्ष’ हे पद गायब झाल्याने आणि प्रफुल पटेल यांनाही बाजूला सारले जात असल्याच्या चर्चांमुळे पक्षातील अंतर्गत दुही चव्हाट्यावर आली आहे. याच गडबडीत आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठी राजकीय गुगली टाकली असून, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती, असे सांगत तटकरेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यातच भर घालत शरद पवार यांनी थेट प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे ‘कार्यक्षम नेते’ म्हणून जाहीर कौतुक केले आहे. “त्यांच्या क्षमतेचा वापर कसा करून घ्यावा, हा त्यांच्या आत्ताच्या नेतृत्त्वाचा अधिकार आहे,” असे सूचक वक्तव्य पवारांनी केले. पक्षफुटीनंतर ज्या नेत्यांवर पवारांच्या गटाकडून सातत्याने टोकदार टीका होत होती, त्यांचे अचानक कौतुक झाल्याने राजकीय पंडितही चक्रावले आहेत.
अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्त्वाच्या पोकळीचा आणि अंतर्गत संघर्षाचा शरद पवार आपल्या राजकीय फायद्यासाठी तर वापर करत नाहीत ना? अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. आपल्या अनपेक्षित आणि गूढ भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या या नव्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळे अजित पवार गटातील अंतर्गत समीकरणे आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांच्या या खेळीमुळे आगामी काळात राज्यात कोणते नवीन राजकीय समीकरण आकारास येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




