रितेश देशमुखच्या ऐतिहासिक महाकलाकृतीची डिजिटल सफारी; जिओहॉटस्टारवर सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. प्रदर्शनाला दोन आठवडे उलटूनही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, आता ज्यांना चित्रपटगृहात जाणे शक्य झाले नाही, ते प्रेक्षक या सिनेमाच्या ओटीटी (OTT) प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी ओटीटीवर येतो, त्यानुसार या भव्य चित्रपटाच्या डिजिटल एन्ट्रीची चर्चा आता रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट जिओहॉटस्टार (JioHotstar) या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, चित्रपटगृहात हा सिनेमा केवळ मराठी आणि हिंदीत प्रदर्शित झाला असला, तरी ओटीटीवर तो मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण ६ भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल. गेल्या १० वर्षांच्या मेहनतीनंतर १ मे रोजी पडद्यावर आलेल्या या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला असून, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे.




