नूर खान एअरबेसवर इराणची विमाने पार्किंगला; अमेरिकेच्या पाठित खंजीर खुपसल्याची सिनेटर्सची टीका, पाकिस्तानने मात्र सर्व आरोप फेटाळले
जागतिक राजकारणात स्वतःला ‘शांततादूत’ म्हणवून घेणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने प्रत्यक्षात इराणच्या लष्करी विमानांना आपल्या भूमीवर आसरा दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर इराणची युद्धविमाने तैनात असल्याचे वृत्त धडकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संभाव्य हवाई हल्ल्यांपासून इराणच्या महागड्या लष्करी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानने ही ‘पार्किंग’ उपलब्ध करून दिल्याचे बोलले जात आहे.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अमेरिकेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक अमेरिकन सिनेटर्सनी पाकिस्तानवर कडाडून टीका करत, ही कृती म्हणजे अमेरिकेच्या ‘पाठित खंजीर खुपसण्यासारखी’ असल्याचे म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “सीबीएस न्यूजचे वृत्त दिशाभूल करणारे आणि केवळ खळबळ उडवून देण्यासाठी दिलेले आहे. आम्ही कोणत्याही इराणच्या लष्करी विमानाला अशा प्रकारची परवानगी दिलेली नाही,” असे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.
पाकिस्तानने असा दावा केला आहे की, इराण आणि अमेरिका यांच्यातील ‘सीजफायर’च्या चर्चेसाठी काही राजनैतिक विमाने इस्लामाबादमध्ये आली होती. त्यामध्ये डिप्लोमॅट्स, सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. चर्चेची पुढील फेरी अपेक्षित असल्याने काही विमाने आणि सपोर्ट स्टाफ अजूनही पाकिस्तानात असल्याचे मंत्रालयाने मान्य केले आहे. विशेष म्हणजे, सीजफायरच्या चर्चेसाठी आलेले इराणचे एक विमान अजूनही पाकिस्तानातच थांबलेले आहे, मात्र ते लष्करी कामासाठी नसल्याचा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे.
गेल्या महिन्यात अमेरिका आणि इराणमध्ये तात्पुरती युद्धबंदी (सीजफायर) जाहीर झाली होती, मात्र पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या फेरीच्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. दोन्ही देश आपल्या अटींवर ठाम असल्याने हा सीजफायर कोणत्याही क्षणी मोडीत निघू शकतो. अशा नाजूक परिस्थितीत पाकिस्तानने इराणला दिलेला छुपा पाठिंबा दक्षिण आशियातील शांततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेमुळे आता अमेरिकेसोबतच्या त्यांच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




