ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून सोडलेल्या उन्हाळी आवर्तना दरम्यान,मंगळवारी दि.१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास,पिंपळगाव जोगा येथे कालव्याला अचानक भगदाड पडून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली.सदरची माहिती कुकडी पाटबंधारे विभागाला देण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी संपर्क केला असता,संबंधित कोणत्याच अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.मात्र पुढील संभाव्य धोका लक्षात घेता, कालव्यातून सोडलेले पाणी येथील शेतकऱ्यांनी तात्काळ बंद केले.येथील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टळले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून तिसरे आणि शेवटचे आवर्तन दि.२० एप्रिल रोजी सुरू करण्यात आले.प्रथम ५० क्युसेकने व नंतर प्रत्येक सहा,सहा तासाच्या अंतराने ५० क्युसेकने पाणी वाढवून दि.२३ एप्रिल रोजी ते २५० क्युसेकने पूर्ण क्षमतेने सोडण्यात आले. धरणातून सोडलेल्या या उन्हाळी आवर्तनादरम्यान मंगळवार दि.१२ एप्रिल रोजी मध्यरात्री पिंपळगाव जोगा येथील सुनिल बबन निमसे यांच्या शेतात कालव्यास भगदाड पडून, मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे.
ज्या ठिकाणी कालवा फुटीची घटना घडली तेथुनच सुमारे दोनशे मिटर अंतरावर सुनील निमसे या बाधित शेतकऱ्याचे घर आहे.दरम्यान सुनिल यांचे बंधू संतोष निमसे मध्यरात्री खळखळ पाण्याचा आवाज आल्यावर निमसे यांनी कालव्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांना कालवा फुटल्याचे समजले. पिंपळगाव जोगा धरणापासून पावनेदोन किलोमीटर अंतरावर कालव्याला भगदाड पडल्यामुळे सुनिल निमसे यांचे सर्वे नंबर १९३ मधील साडेचार एकर क्षेत्रात काढणीस आलेला धना व भुईमुग पिकाचे नुकसान झाले आहे.कालवा फुटल्यामुळे निमसे यांचे शेततळे,विहीर व विद्युत मोटारी गाडल्या आहेत.शंकर सखाराम हांडे यांचे झेंडू तसेच टोमॅटो पिकाचे नुकसान होऊन यांची देखील विहिर मोटार पाण्याखाली गेली आहे.यांच्यासह इतर आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतीचे या कालवा फुटीने नुकसान झाल्याचे समजते.
येथील शेतकऱ्यांनी कालवा फुटल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभागाला दिली. कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व उपअभियंता रवींद्र हांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व कालवा दुरूस्तीचे कामाला सुरूवात करण्यात आली. सन १९९५ साली पिंपळगाव जोगा धरण व कालवाच्या कामाला सुरूवात झाली सन २००७ साली धरणातून आवर्तन सुरू झाले २० वर्ष झाले.दरम्यान पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याला ठिक-ठिकाणी मोठ मोठ्या भेगा पडल्या असून,कालव्याला मोठ्या प्रमाणावर तडे गेलेले आहेत.तर कालव्याचे अस्तरीकरण पूर्णपणे उखडलेले आहे.ओतूरच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यात कालव्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष व झुडपे वाढलेली असल्याने,कालव्याला तडे जाऊन कालव्याची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे.जुन्नर तालुक्यातील ४७ किलोमिटर अंतरावर कालवा फुटीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत.यामुळे कालव्या लगतच्या शेतजमीनींचे मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी नुकसान झाले आहे.कुकडी पाटबंधारे विभागाने तात्काळ सदर कालव्याची दुरूस्ती करून,अस्तरीकरणाचे काम हाती घ्यावे व पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
जुन्नर व पारनेर तालुक्यातील एकुण ७२ किलोमिटर कालवा अस्तरीकरणकरिता सुमारे ९४ कोटीचा प्रस्ताव तयार करून कालवा विशेष दुरूस्तीचे अंदाजपत्रक बनवून महामंडळामार्फत राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता घेऊन शासनाला पाठवणार आहे.




