आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि वादाचं एक असं कनेक्शन तयार झालंय, ज्याची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावरच जास्त होतेय. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार का? ज्या खेळाडूला मोठ्या गाजावाजात गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून आणलं, ज्याच्यासाठी रोहित शर्मासारख्या यशस्वी कॅप्टनला बाजूला सारलं, तोच हार्दिक आता मुंबई इंडियन्स सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि या सगळ्या वादाचं केंद्रस्थान पुन्हा एकदा ठरलं आहे ‘इंस्टाग्राम’. इंस्टाग्रामवर नेमकं काय घडलं? हार्दिकने खरंच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं होतं का? आणि तो चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) का जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत?
मुंबई इंडियन्स आणि इंस्टाग्रामचं नातं गेल्या काही महिन्यांपासून खूपच विचित्र राहिलं आहे. तुम्हाला आठवत असेलच, जेव्हा रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, तेव्हा त्याची अधिकृत घोषणा एका इंस्टाग्राम पोस्टद्वारेच झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी इंस्टाग्रामवर ‘ब्रोकन हार्ट’ (तूटलेलं हृदय) आणि गुडघ्याला जखम झाल्याचे फोटो पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली होती. हे सगळं हार्दिक पंड्याला कॅप्टन केल्यामुळे झालं होतं, हे आता लपून राहिलेलं नाही. आता पुन्हा एकदा हार्दिकच्या एका सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीने चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. काही युजर्सचा असा दावा आहे की, हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आणि पुन्हा फॉलो केलं. एवढंच नाही तर त्याने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारख्या सहकाऱ्यांनाही अनफॉलो केल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटवर नाराज आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली होती, त्यासोबतच हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मैदानावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. या सगळ्या मानसिक त्रासामुळे आणि टीममधील अंतर्गत गटबाजीमुळे हार्दिक नाराज असल्याचं बोललं जातंय. हार्दिकने सूर्यकुमार आणि तिलकला अनफॉलो केल्याच्या बातम्यांमुळे या चर्चेला अधिक हवा मिळाली. मात्र, अधिकृतपणे अद्याप कोणीही यावर भाष्य केलेलं नाही. जर हार्दिकने खरंच संघ सोडला, तर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल कारण त्यांनी त्याला आणण्यासाठी प्रचंड मोठी किंमत मोजली आहे आणि रोहितच्या कॅप्टन्सीचा बळी दिला आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न हा की, जर हार्दिकने मुंबई सोडली, तर तो जाणार कुठे? सध्या सोशल मीडियावर हार्दिक सीएसकेमध्ये जाण्याच्या अफवांना उधाण आलं आहे. यामागचं कारण म्हणजे एमएस धोनीसोबतचे हार्दिकचे असलेले जवळचे संबंध. धोनी हार्दिकचा मेंटॉर मानला जातो. सीएसकेला आता अशा एका खेळाडूची गरज आहे जो भविष्यात कॅप्टन्सी सांभाळू शकेल आणि हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू त्यांच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. तसंच, हार्दिकला मुंबईत जेवढी टीका सहन करावी लागली, त्या तुलनेत सीएसकेचं वातावरण खूप शांत आणि पाठिंबा देणारं असतं. त्यामुळेच सोशल मीडिया युजर्स तर्क लावत आहेत की, हार्दिक पंड्या पुढच्या सीझनमध्ये पिवळ्या जर्सीत दिसू शकतो.
इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की, सोशल मीडियावरील ‘अनफॉलो’च्या बातम्या बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे किंवा अफवांच्या जोरावर पसरवल्या जातात. हार्दिक सध्या इंज्युरीमुळे टीमच्या बाहेर आहे आणि पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत मुंबई इंडियन्स किंवा हार्दिक स्वतः यावर स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील. हार्दिकने खरंच सूर्यकुमारला अनफॉलो केलं होतं की ही केवळ फोटोशॉप केलेली इमेज होती, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण एक मात्र नक्की, मुंबई इंडियन्सच्या गटात सध्या सगळं काही आलबेल नाहीये. अंतर्गत वाद आणि खेळाडूंमधील मतभेद सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बाहेर येत आहेत.




