Mumbai Water Crisis : मुंबईवर पाणीटंचाईचे सावट; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

spot_img

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने अखेर पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवार १५ मे २०२६ पासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत ही कपात कायम ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये सध्या केवळ ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा वार्षिक गरजेच्या तुलनेत अवघ्या २३.५२ टक्क्यांवर आला असून, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे जलाशयांमधील साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने भविष्यातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील वाढते तापमान आणि त्यामुळे वाढणारा बाष्पीभवनाचा वेग हे पाणीसाठा घटण्यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. याशिवाय, अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, अपेक्षित पाऊस वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात होईल का, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी अधिक काळ पुरावे आणि भविष्यातील टंचाई टाळता यावी यासाठी जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपात लागू करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वाया घालवणे टाळावे, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि शक्य तितकी पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आगामी काही आठवड्यांत पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर पाणी कपात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ