वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पारंपरिक बटाट्याच्या वड्याला आता नॉनव्हेज ट्विस्ट देत मसालेदार चिकन वडापावची रेसिपीही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. घरच्या घरी सहज तयार होणारा हा पदार्थ चवीसोबतच वेगळा अनुभव देतो. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पार्टी स्नॅक्ससाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
ही रेसिपी तयार करण्यासाठी सर्वप्रथम बोनलेस चिकनचा खिमा एका भांड्यात घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. मसाल्यांचा सुगंध आणि चिकनचा स्वाद एकत्र आल्यामुळे या मिश्रणाला खास चव प्राप्त होते.
यानंतर तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे वडे बनवून घ्यावेत. दुसऱ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ तयार करावे. हे पीठ भज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिठासारखे असावे.कढईत तेल गरम झाल्यानंतर तयार चिकन वडे बेसनाच्या पिठात घोळवून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ असे हे वडे खायला अतिशय स्वादिष्ट लागतात.
सर्व्ह करताना लादी पावमध्ये हिरवी चटणी लावून गरमागरम चिकन वडा ठेवावा. इच्छेनुसार तळलेली हिरवी मिरची किंवा कांदा सोबत दिल्यास चव आणखी खुलते. झटपट तयार होणारा हा चिकन वडापाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल.




