जागतिक स्तरावर भारतीय पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, भारतीय पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. जगातील पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ‘पुलित्झर पुरस्कार २०२६’ नुकताच जाहीर झाला असून, यात आनंद आर. के. आणि सुप शर्मा या दोन भारतीय पत्रकारांनी बाजी मारली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ आणि सायबर फ्रॉड यांसारख्या गंभीर विषयावर केलेल्या ‘ट्रॅप्ड’ (Trapped) या शोधनिबंधासाठी (Investigative Report) त्यांना हा बहुमान मिळाला आहे.
आनंद आर. के. आणि सुप शर्मा यांनी जागतिक माध्यम संस्था ‘ब्लूमबर्ग’साठी काम करताना ‘ट्रॅप्ड’ (Trapped) हा विशेष प्रकल्प राबवला. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी सध्या देशाला विळखा घालणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ या गुन्हेगारी प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. सीबीआय किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना व्हिडिओ कॉलवर तासनतास ‘अटकेत’ ठेवणे आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणे, या प्रक्रियेचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले.
या रिपोर्टमध्ये त्यांनी लखनऊमधील एका सुशिक्षित न्यूरोलॉजिस्टची कथा मांडली आहे, ज्यांची सायबर भामट्यांनी २.८ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. केवळ गुन्ह्याची माहितीच नाही, तर हे गुन्हेगार ग्राफिक्स आणि डेटाचा वापर करून लोकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात, याचे उत्कृष्ट सादरीकरण ‘इंटरनॅशनल रिपोर्टिंग’ आणि ‘ग्राफिक स्टोरीटेलिंग’ श्रेणीत करण्यात आले आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने आधुनिक काळातील पाळत ठेवण्याच्या यंत्रणेवरही (Surveillance) चर्चा सुरू झाली आहे. पेगासससारखी सॉफ्टवेअर्स आणि सोशल मीडिया कंपन्यांच्या मदतीने सरकार सामान्य लोकांच्या निर्णय प्रक्रियेवर आणि विचारांवर कसे नियंत्रण मिळवत आहे, याचे संदर्भही या निमित्ताने दिले जात आहेत. ‘द ग्रेट हॅक’ आणि ‘सोशल डायलेमा’ यांसारख्या डॉक्युमेंटरीजमधून समोर आलेले इंटरनेटचे भयावह वास्तव आनंद आणि सुप शर्मा यांच्या रिपोर्टिंगमुळे पुन्हा एकदा जागतिक पटलावर आले आहे.
९१७ मध्ये अमेरिकेतील ‘जोसेफ पुलित्झर’ यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची सुरुवात झाली. पत्रकारिता, साहित्य, संगीत आणि नाटक या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. विजेत्याला प्रमाणपत्र आणि १५,००० डॉलर्स रोख दिले जातात. कोलंबिया विद्यापीठ आणि पुलित्झर बोर्ड या पुरस्काराचे कामकाज पाहतात.
‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२६’ नुसार १८० देशांच्या यादीत भारत १५७ व्या स्थानावर फेकला गेला आहे. भारतीय पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात असताना, आनंद आर. के. आणि सुप शर्मा यांच्या यशाने भारतीय पत्रकारांना नवी उमेद दिली आहे. याआधी दानिश सिद्दीकी आणि अदनान आबिदी यांसारख्या भारतीयांनी हा सन्मान मिळवला होता. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतीय पत्रकारांनी जागतिक मंचावर मारलेली ही मजल केवळ कौतुकास्पदच नाही, तर सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाला आणि जनतेला नवी दिशा देणारी ठरेल.




