बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा वाटपाशी संबंधित कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना विशेष तपास पथकाने (SIT) लातूर येथून अटक केली आहे. दिवसभर चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना वाढीव मावेजा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या आदेशांवर खोट्या सह्या आणि मागील तारखा वापरून कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासानुसार, अविनाश पाठक यांची बदली एप्रिल २०२५ मध्ये झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील जुन्या तारखा वापरून आदेश जारी करण्यात आले. एकूण १५४ प्रकरणांमध्ये सुमारे २४१ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापैकी जवळपास ७३ कोटी रुपयांचे वाटप संबंधित खातेदारांना करण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
या प्रकरणी यापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये अविनाश पाठक यांचेही नाव समाविष्ट होते. विशेष म्हणजे, वाढीव मोबदल्यासंदर्भातील अनेक आदेशांची अधिकृत नोंद किंवा रजिस्टर उपलब्ध नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




