ओतूर,प्रतिनिधी [ रमेश तांबे ]
डिंगोरे दत्तवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा उचकटुन घरात प्रवेश करून, एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून,त्यांची रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. सदरची कारवाई ओतूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे.
कबीर उंबऱ्या काळे वय-२४ वर्षे,असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अक्षय शिवाजी उकिर्डे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तकार दाखल केली आहे. याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,सहादु सावळेराम उकिर्डे वय ८६ वर्षे,रा.दत्तवाडी, डिंगोरे ता. जुन्नर जि.पुणे हे घरामध्ये झोपलेले असताना दि.२२ मार्च रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी घराचा कडी कोयंडा उचकटुन घरात प्रवेश करून सहादु सावळेराम उकिर्डे यांना मारहाण करून १५ हजार रूपये रोख रक्कम तसेच ५ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरी करून नेला होता.या बाबत अक्षय शिवाजी उकिर्डे यांनी दि. २२ मार्च २०२६ रोजी तकार दिल्याने अज्ञात तीन आरोपींचे विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचा समांतर तपास ओतूर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्फत चालु होता.सदरचा गुन्हा हा आरोपी कबीर उंबऱ्या काळे वय-२४ वर्षे,बाबुशा पिंग्या उर्फ चिंगळया काळे वय-२२ वर्षे, शुभम पिंग्या काळे वय-२० वर्षे, रवी लाला भोसले वय ५० वर्षे सर्व राहणार सुरेगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील आरोपींवर वेगवेगळया पोलीस स्टेशनला गंभीर गुन्ह्यांची नोंद असुन आरोपी नामे कबीर उंबऱ्या काळे वय-२४ वर्षे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा जि. अहील्यानगर यास दि.५ मे रोजी अटक करण्यात आले असुन सदरचा आरोपी पोलीस कस्टडीत असताना त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरी गेलेली १५ हजार रूपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दि.६ मे २०२६ रोजी आरोपी कबीर उंबऱ्या काळे याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक संपिद आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार दिनेश साबळे, पोलीस कॉन्टेबल सुभाष केदारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस हवालदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदिप वारे यांनी केली.




