Amanpreet Singh Gill : माजी अंडर-१९ क्रिकेटपटू अमनप्रीत सिंह गिल यांचे निधन; भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा

spot_img

विराट कोहलीसोबत खेळलेला क्रिकेटपटू वयाच्या ३६व्या वर्षी काळाच्या पडद्याआड; युवराज सिंहसह अनेकांनी व्यक्त केला दु:खभाव भारताच्या माजी अंडर-१९ क्रिकेटपटू अमनप्रीत सिंह गिल यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. बुधवारी चंदीगड येथे त्यांनी वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी क्रिकेट क्षेत्रात त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमनप्रीत सिंह गिल हे पंजाबकडून मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून खेळले होते. त्यांनी भारताच्या अंडर-१९ संघात विराट कोहली यांच्यासोबत क्रिकेट खेळले होते. २००७ मध्ये त्यांनी भारतासाठी पाच युवा एकदिवसीय सामने आणि एक युवा कसोटी सामना खेळला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी श्रीलंकेच्या थिसारा परेरा यांची विकेट घेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाबसाठी सहा प्रथम श्रेणी सामने खेळताना ११ विकेट्स घेतल्या. तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा भाग होते. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी पंजाब क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये सदस्य म्हणूनही योगदान दिले. पंजाब क्रिकेट असोसिएशन यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही अमनप्रीत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली होती, ते शांत आणि मेहनती क्रिकेटपटू होते, अशा शब्दांत युवराजने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ