पाय दुखणे ही अनेकांना भेडसावणारी सामान्य समस्या असली तरी तिच्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता, पाण्याची कमी मात्रा किंवा जास्त श्रम यामुळे पाय दुखतात. मात्र अनेकदा आपण दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपण वापरत असलेल्या चपला किंवा शूज. चुकीच्या प्रकारचे किंवा अयोग्य फिटिंगचे फुटवेअर हे पाय दुखण्याचे मोठे कारण ठरू शकते.
विशेषतः उंच टाचांचे किंवा कडक तळव्याचे शूज दीर्घकाळ वापरल्यास पायांवर अनावश्यक ताण येतो. तसेच, जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे यामुळे स्नायूंवर दबाव वाढतो आणि वेदना निर्माण होतात. खूप घट्ट किंवा खूप सैल चपला वापरल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होऊन अस्वस्थता वाढते. सपाट चपला किंवा खूप मऊ अथवा खूप कठीण तळ असलेले शूज टाचेवर ताण देतात, ज्यामुळे वेदना अधिक तीव्र होऊ शकतात. याशिवाय, जुने किंवा झिजलेले फुटवेअर वापरल्यास पायांना आवश्यक आधार मिळत नाही. त्यामुळे पाय दुखण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे योग्य चपलांची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे.
फुटवेअर खरेदी करताना आपल्या पायाच्या आकारानुसार योग्य फिटिंग निवडणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळच्या वेळेस शूज खरेदी करणे योग्य मानले जाते, कारण त्या वेळी पाय थोडे सूजलेले असतात आणि योग्य आकार मिळतो. शूजमध्ये चांगले कुशनिंग आणि आतून आधार देणारी रचना असावी, ज्यामुळे चालताना किंवा उभे राहताना पायांवर कमी दाब पडतो.
तसेच, टाच मजबूत असलेले आणि स्थिरता देणारे फुटवेअर वापरणे आवश्यक आहे. वेळोवेळी चपला बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास पायांचे आरोग्य टिकवून ठेवता येते आणि दैनंदिन जीवन अधिक आरामदायक बनते.




