श्री गणेश भक्तांसाठी संकष्टी आणि विशेषतः अंगारकी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा 5 मे 2026 रोजी अंगारकी चतुर्थी येत असल्याने अनेकजण श्रद्धेने उपवास करणार आहेत. मात्र सध्या वाढलेले तापमान लक्षात घेता, उन्हाळ्यात उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. विशेषतः शरीर हायड्रेट ठेवणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
उपवासाच्या दिवशी फक्त पाणी पिण्यावर अवलंबून न राहता, शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाईट्स मिळतील अशा नैसर्गिक पेयांचा समावेश करावा. शहाळ्याचे पाणी हे यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामध्ये पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. कोकम सरबत देखील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यात साखर आणि सैंधव मीठ घातल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. तसेच, ताकामध्ये सैंधव मीठ आणि जिरेपूड घालून घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो. फळांमध्ये कलिंगड, टरबूज, द्राक्षे आणि संत्री यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. उपवासाच्या पदार्थांमध्ये काकडीचा वापर केल्यास डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
उपवास करताना तेलकट आणि जड पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे. साबुदाणा वडा किंवा बटाटा वेफर्स खाल्ल्याने तहान अधिक लागते आणि शरीरात उष्णता वाढते. त्याऐवजी हलके पदार्थ जसे साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात आणि दही खाणे अधिक फायदेशीर ठरते. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित ठेवणे देखील आवश्यक आहे, कारण त्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. योग्य आहार आणि द्रवपदार्थांचा समतोल राखल्यास उपवास करतानाही आरोग्य चांगले ठेवता येते आणि दिवस अधिक उत्साहाने पार पडतो.




