बाबा पवार गंभीर जखमी, भाभा रुग्णालयात उपचार सुरू; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
मुंबईतील गजबजलेल्या कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी रात्री ८:३० च्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हलाव पुलाजवळ बाबा एलप्पा पवार नावाच्या इसमावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर तातडीने त्याला कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक (क्रिटिकल) असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी बाबा पवारची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की हे गँगवॉरचे नवे वळण आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. कुर्ल्याच्या व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असून, या गोळीबारामागील मुख्य सूत्रधार आणि कारणाचा छडा लवकरच लावला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.




