रोहित शर्माच्या कमबॅककडे चाहत्यांचे लक्ष, तर सँटनरच्या जागी ‘या’ फिरकीपटूला मिळणार संधी; प्लेऑफसाठी विजयाशिवाय पर्याय नाही
आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला असून, १९ व्या मोसमात संघ सध्या ९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. ७ सामन्यांपैकी केवळ २ विजयांची नोंद असलेल्या मुंबईसाठी आता उर्वरित प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असा आहे. आज घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ४१ व्या सामन्यात विजय मिळवून पराभवाची मालिका खंडित करण्याचे मोठे आव्हान हार्दिक पंड्या आणि कंपनीसमोर असणार आहे. हैदराबादचा संघ सध्या फॉर्मात असून त्यांच्याकडे फलंदाजीची मोठी ताकद आहे, त्यामुळे मुंबईला आपली रणनीती चोख ठेवावी लागणार आहे.
संघातील महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना मुकला आहे, मात्र आजच्या सामन्यात तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून परतण्याची दाट शक्यता आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला क्विंटन डी कॉकला चांगल्या साथीदाराची गरज आहे. दुसरीकडे, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर संपूर्ण हंगामातून बाहेर पडला असून, त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याचा संघात समावेश करण्यात आला आहे. सँटनरच्या जागेवर केशव महाराजला संधी मिळणार की फलंदाजी मजबूत करण्यासाठी विल जॅक्सला खेळवले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरणाऱ्या मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उर्वरित ७ पैकी किमान ६ सामने जिंकणे आवश्यक आहे.




