स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होतोय बहिणींच्या जिव्हाळ्याचा प्रवास; गौरी इंगवलेची मालिका विश्वात पहिली दमदार एन्ट्री
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय वाहिनी ‘स्टार प्रवाह’ लवकरच आपल्या प्रेक्षकांसाठी ‘पाठराखीण’ ही एक नवीकोरी आणि भावनिक मालिका घेऊन येत आहे. ही कथा आहे भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची, ज्या कोणत्याही संकटात एकमेकींची सावली बनून उभ्या राहतात. बहिणींच्या नात्यातील त्याग आणि निस्सीम प्रेमावर आधारित असलेली ही मालिका एका अनपेक्षित वळणामुळे कशी बदलून जाते, याची रंजक मांडणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ऐतिहासिक भूमिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. तिच्या सोबतीला मराठी चित्रपटांतील गुणी अभिनेत्री गौरी इंगवले ही या मालिकेच्या माध्यमातून टीव्ही जगतात आपले पहिले पाऊल टाकत आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन्ससोबत काम करणे ही तिच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तिने यात ‘प्राजक्ता कुलकर्णी’ ही व्यक्तिरेखा साकारली असून, मामा-मामींच्या शब्दाखातर आपल्या घरासाठी काहीही करण्याची तिची तयारी असते. दुसरीकडे, गौरी इंगवले हिने देखील मालिका विश्वात प्रवेश करण्यासाठी आपली उत्सुकता व्यक्त केली आहे. “टीव्ही माध्यमामुळे आपण थेट प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचतो, त्यामुळे हे काम माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि आनंदाचे असेल,” असे गौरीने नमूद केले. सुप्रसिद्ध बांदेकर कुटुंबीयांच्या निर्मिती संस्थेमार्फत ही मालिका साकारली जात असून, लवकरच प्रेक्षकांना दोन बहिणींचा हा भावनिक प्रवास अनुभवायला मिळणार आहे.




