मे अखेरपर्यंत राजस्थानच्या सीमेवर होणार तैनात; ४०० किमीच्या टप्प्यात येणारी शत्रूची विमाने आणि ड्रोन आता होणार क्षणात खाक
भारताच्या हवाई सुरक्षेला अभेद्य कवच देणारी ‘S-400’ एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या या प्रणालीची आता चौथी खेप भारताकडे रवाना झाली आहे. रशियाने या प्रणालीचा चौथा संच पाठवला असून, मे महिन्याच्या अखेरीस ती भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रत्यक्ष तैनात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर भारताची नजर अधिक तीक्ष्ण होणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियाने ही चौथी प्रणाली भारताकडे पाठवली असून ती मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतीय बंदरात पोहोचेल. विशेष म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबरमध्ये पाचवी प्रणाली देखील भारतात दाखल होणार आहे. २०१८ मध्ये भारताने रशियासोबत ५.५ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक करार केला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान याच S-400 ने आपली ताकद दाखवून दिली होती, ज्यासमोर शत्रूची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन केवळ खेळणी ठरली होती. शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्या सर्व आक्रमक योजना या एकाच प्रणालीने धुळीस मिळवल्या होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन S-400 प्रणालीची चाचणी भारतीय हवाई दलाच्या तज्ज्ञांनी १८ एप्रिलपूर्वीच पूर्ण केली आहे. ही चौथी सिस्टीम राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानमधील कोणतेही हवाई लक्ष्य नष्ट करण्याची भारताची क्षमता कित्येक पटीने वाढणार आहे. ४०० किलोमीटरची अफाट मारक क्षमता असलेली ही सिस्टीम जगातील सर्वात प्रगत मानली जाते, ज्यासमोर अमेरिकेची F-35 आणि F-16 सारखी आधुनिक लढाऊ विमानेही हतबल ठरतात.
सध्या भारताकडे तीन S-400 प्रणाली कार्यरत असून त्या पंजाब, लडाख आणि सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये भारताचे रक्षण करत आहेत. आता चौथ्या प्रणालीच्या आगमनाने भारताचा हवाई रक्षण कवच अधिक मजबूत झाले आहे. मोदी सरकारने आधीच आणखी पाच प्रणाली खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, यामुळे आशिया खंडातील भारताचे लष्करी वर्चस्व अधिक प्रस्थापित होणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असूनही रशियाने भारताला दिलेल्या वेळेत ही प्रणाली उपलब्ध करून देणे, हे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक मानले जात आहे.




