सुट्टे पैसे नसल्याचं सांगून अल्पवयीन मुलीला खाली बोलावले आणि मोबाईलवर दाखवलं अश्लील कृत्य
मुंबईतील मालाड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या क्रेझचा फायदा घेत एका डिलिव्हरी बॉयने माणुसकी आणि विश्वासाला काळिमा फासला आहे. घरात कुणीही मोठे नसल्याचा फायदा घेत या नराधमाने १२ वर्षांच्या निष्पाप मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, मात्र या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील एका महिलेने ऑनलाईन साडीची ऑर्डर दिली होती. मोहम्मद उपेश अनवर अंसारी (वय २४) हा डिलिव्हरी बॉय साडीचे पार्सल देण्यासाठी त्या घरी पोहोचला. घरात त्यावेळी केवळ १२ वर्षांची मुलगी एकटीच होती. साडी दिल्यानंतर त्याने सुट्टे पैसे नसल्याचे नाटक रचले आणि “माझ्यासोबत खाली कुणालातरी पाठवा, मी पैसे देतो” असे सांगून त्या मुलीला इमारतीच्या खाली नेले. खाली पोहचताच पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ लावून त्या मुलीला दाखवायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. लोकांची गर्दी जमा होण्यापूर्वीच नराधम अंसारी तिथून पसार झाला.
मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर तात्काळ मालाड पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला आणि मालाड मालवणी परिसरातून मोहम्मद उपेश अनवर अंसारी याला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. याआधीही डिलिव्हरी बॉयने ग्राहकांशी वाद घातल्याच्या घटना घडल्या आहेत, पण या प्रकरणाने तर हद्दच ओलांडली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




