राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पारा ४० पार; दुपारी १२ ते ४ घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन, अकोला ठरले देशातील सर्वात उष्ण शहर
संपूर्ण देशाला सध्या सूर्याच्या प्रखर झळा सोसाव्या लागत असून, ईशान्य भारत वगळता संपूर्ण देश जणू तापलेल्या तव्यावर उभा आहे. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भाची स्थिती ‘धगधगत्या भट्टी’सारखी झाली असून, अकोला जिल्ह्याने रविवारी ४६.९ अंश सेल्सिअससह देशातील उच्चांकी तापमानाची नोंद केली आहे. अमरावती आणि यवतमाळ देखील ४७ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुण्यासारख्या शहरातही पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उन्हाच्या तीव्रतेने हैराण झाले आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील हा सर्वाधिक दाहक उन्हाळा ठरत असून, २०१९ नंतर पहिल्यांदाच अकोल्याचा पारा ४७ अंशांच्या इतका जवळ पोहोचला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि गोंदियामध्येही ४५ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गोंदियात ४४.५ अंशांच्या उन्हामुळे रस्त्यांवर दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. कडक उन्हाचा थेट परिणाम टाळण्यासाठी दुपारी १२ ते ४ या वेळेत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील ४८ तास उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याने सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.




