Bigg Boss Sonali Raut : “कतरिना-दीपिका माल्यामुळेच फेमस झाल्या!” ‘बिग बॉस’ फेम सोनाली राऊतचा विजय माल्याबद्दल खळबळजनक खुलासा

spot_img

किंगफिशर कॅलेंडरने बदललं नशीब; स्वतःला महत्त्व कसं द्यायचं आणि कसं जगायचं हे माल्यानेच शिकवलं, सोनालीने उघडले अनेक सिक्रेट्स.

हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी ६’ मुळे चर्चेत आलेली अभिनेत्री सोनाली राऊत हिने माल्याबद्दल असे काही दावे केले आहेत, ज्यामुळे मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. सोनालीच्या मते, बॉलिवूडमधील आजच्या अनेक टॉप अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं श्रेय विजय माल्याला जातं. किंगफिशर कॅलेंडरमुळेच दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींच्या करिअरला खरी दिशा मिळाली, असा मोठा दावा तिने एका मुलाखतीत केला आहे.

सोनाली राऊतने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर घराच्या अस्वच्छतेवरून निर्मात्यांवर निशाणा साधला होता. तिथल्या अस्वच्छतेमुळे आपल्याला ‘स्किन ॲलर्जी’ झाल्याचे सांगताना तिने तिच्या शिस्तीचे श्रेय थेट विजय माल्याला दिले. सोनाली म्हणते की, “माझ्या स्वच्छतेच्या सवयी आणि शिस्त ही विजय माल्या यांच्या सहवासामुळे लागली आहे. मी जेव्हा किंगफिशर कॅलेंडरसाठी शूट केले, तेव्हा मला माल्यांकडून बरंच काही शिकायला मिळालं. तो एक अत्यंत क्लासी आणि दयाळू माणूस आहे, ज्याला इतरांना भरभरून द्यायला आवडतं. लोक काय विचार करतील, याची चिंता त्याने कधीच केली नाही.”

सोनालीने पुढे किंगफिशर कॅलेंडरच्या ट्रेनिंगबद्दलही धक्कादायक माहिती दिली. ती म्हणाली की, बिकिनी कॅलेंडर शूटसाठी निवड झाल्यानंतर पहिले तीन महिने कडक ट्रेनिंग दिले जाते. “मी जेव्हा निवडली गेले तेव्हा मी थोडी जाड होते, पण माल्यांनी उपलब्ध करून दिलेल्या बेस्ट ट्रेनर्समुळे माझे वजन तीन महिन्यात कमी झाले. केसांची काळजी कशी घ्यायची, काय खायचं, लोकांशी कसं बोलायचं आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं, हे सर्व प्रशिक्षण मला माल्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालं. माल्यांमुळेच आम्हाला आमच्या करिअरमध्ये एक वेगळी ओळख मिळाली,” असे सांगत सोनालीने फरार उद्योगपतीचे चक्क गोडवे गायले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ