Cyber Crime : अक्षय कुमारच्या मुलीकडे मागितले आक्षेपार्ह फोटो; तांत्रिक तपासाच्या जाळ्यात अडकला नराधम

spot_img

डिजिटल युगात ऑनलाईन गेमिंगचा छंद मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या १३ वर्षीय मुलीला ऑनलाईन गेम खेळताना नग्न फोटोंची मागणी करणाऱ्या एका विकृत आरोपीला महाराष्ट्र नोडल सायबर सेलने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या वर्षी एका सायबर जनजागृती कार्यक्रमात अक्षय कुमारने या घटनेचा उल्लेख केला होता, त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या अटकेची पुष्टी केली असून, आरोपीने इतर कोणाशी अशा प्रकारचे गैरवर्तन केले आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

या घटनेची सुरुवात एका ऑनलाईन व्हिडिओ गेमपासून झाली. खेळ खेळताना या अनोळखी व्यक्तीने मुलीशी संवाद वाढवून तिचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला सामान्य वाटणारे हे संभाषण नंतर अश्लील वळणावर गेले आणि आरोपीने चक्क नग्न फोटोंची मागणी केली. मुलीने प्रसंगावधान राखत ही बाब तात्काळ आपल्या पालकांना सांगितली, ज्यावर अक्षय कुमारने विलंब न लावता सायबर अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर सायबर सेलने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला जेरबंद केले.

या प्रकरणामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी सर्व पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुले मोबाईलवर कोणता गेम खेळतात, कोणाशी गप्पा मारतात आणि सोशल मीडियावर त्यांचे वर्तन कसे आहे, याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. इंटरनेटच्या आभासी जगात वावरताना मुलांनी अनोळखी लोकांपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती तात्काळ पालकांना किंवा पोलिसांना द्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ