Mumbai Crime : किरकोळ कारणामधून झालेला वाद पेटला, युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांना अटक

spot_img

मुंबईतील भायखळा परिसरात एक साधा वाद गंभीर हाणामारीत परिवर्तित झाल्याची घटना समोर आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार युसूफ खान यांच्या म्हणण्यानुसार, ते कारने जात असताना रस्त्यातील डबक्यातील पाणी चुकून शोएब खान यांच्या अंगावर उडाले. या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. घटनेनंतर युसूफ खान तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले असताना काही जणांनी त्यांना अडवून हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात आठ ते नऊ जण सहभागी होते, आणि त्यांनी बेसबॉल बॅट तसेच बांबूच्या साहाय्याने मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पठाण यांचे सासरे खालिद खान, मेहुणे उमरशाद खान आणि इतर काही नातेवाईकांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्ल्यात युसूफ खान यांचे भाऊ सलमान यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं असून, काका जाकी अहमद गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, पीडितांकडून सांगण्यात आलं की, पाणी उडाल्यानंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबवून माफी मागितली होती. तरीही समोरच्या व्यक्तीने रागाच्या भरात कारचे नुकसान केल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाही, तर रुग्णालयात जात असतानाही पुन्हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुसरीकडे, उमरशाद खान यांनीही युसूफ खान यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे हा वाद नेमका पूर्वनियोजित होता की अचानक उद्भवलेला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ