Virat Kohli : दुखापतीवर मात करत ‘किंग’ची झुंजार खेळी

spot_img

अर्धशतक हुकले तरी ३४ चेंडूत ४९ धावा कुटून बंगळुरूला मिळवून दिली महत्त्वाची जीत

आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे विराट कोहली. गेल्या सामन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे विराट लखनौविरुद्ध खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, मैदानात उतरताच विराटने आपल्या तंदुरुस्तीचा आणि जिद्दीचा परिचय दिला. लखनौने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फिल सॉल्ट (९) आणि देवदत्त पडिक्कल (१०) स्वस्तात बाद झाले, पण विराटने एक बाजू लावून धरली. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४९ धावांची महत्त्वाची खेळी केली. अवघ्या एका धावेने त्याचे ६६ वे अर्धशतक हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने आरसीबीचा विजय सुकर केला.

विशेष म्हणजे, मैदानात धावांचा पाठलाग करताना विराट अत्यंत शांत चित्ताने खेळत होता. आपल्या दुखापतीची तमा न बाळगता त्याने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या खेळीदरम्यान तो मोहम्मद शमीसोबत हलक्या-फुलक्या गप्पा आणि विनोद करतानाही दिसला. ३५० आयपीएल सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या विराटने आता या स्पर्धेत सुमारे ९ हजार धावा पूर्ण केल्या असून, त्यात ८ शतकांचा समावेश आहे. डावाच्या अखेरीस आवेश खानच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो निकोलस पूरनच्या हाती झेल देऊन बाद झाला, मात्र तोपर्यंत विजयाचे पारडे आरसीबीच्या बाजूने झुकले होते.

विराटच्या या समर्पणाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. खलील अहमदच्या स्नायूंच्या दुखापतीचा दाखला देत सिद्धू म्हणाले की, “विराट कोहलीची तंदुरुस्ती वाखाणण्याजोगी आहे; त्याच्यासारख्या फिट खेळाडूच्या बाबतीत दुखापतीमुळे खेळ थांबवणे ही गोष्ट सहसा घडत नाही.” दुखापत असूनही मैदानावर उतरून संघाला विजय मिळवून देण्याच्या विराटच्या या वृत्तीने पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. या विजयामुळे आरसीबीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ